देशातील ७५ जिल्हे लॉक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पीटीआय
सोमवार, 23 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्य सरकारांनी केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना देशभरातील जनतेने आजचा ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केला.

नवी दिल्ली - अवघ्या जगावर कोरोना विषाणूच्या संसर्गाची काळी मृत्यू छाया पसरली असताना आज भारताने मात्र या संसर्गाविरोधात थेट युद्ध पुकारले आहे. या विषारी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अवघा देश आज घरामध्ये थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्‍यक सेवांमध्ये सहभागी असेलल्यांचा सन्मान करण्यासाठी सायंकाळी प्रत्येक नागरिकाने घराची गॅलरी, दारामध्ये उभे राहत घंटानाद केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्य सरकारांनी केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना देशभरातील जनतेने आजचा ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केला. संसर्गाचे हे संकट दीर्घकाळ कायम राहणार असल्याने देशातील विविध राज्यांतील ७५ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी करण्यात आली असून, येथे बाहेरच्या नागरिकांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरराज्य बससेवाही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली असून, पंतप्रधानांचे मुख्य आणि केंद्रीय सचिवांनी विविध राज्य सचिवांची एक उच्चस्तरीय बैठक आज घेतली. या बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्‍यक प्रवास टाळावा असेही गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेले जिल्हे हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत. नोएडामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यावर उत्तर प्रदेशानेही मोठ्या शहरांत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्ली, तमिळनाडू पंजाब, उत्तराखंड,राजस्थान, केरळ, पश्‍चिम बंगाल आदी १३ राज्यांनी आतापावेतो हाच कित्ता गिरविला आहे. संसर्गाविरोधातील ही लढाई दीर्घकाळ चालणारी असल्याने देशभरातील ही टाळेबंदी आणखी काही काळ सुरूच राहण्याची शक्यता असून, जनतेनेही सहकार्य करत घरामध्येच राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. आज अत्यावश्‍यक सेवा वगळता देशभरातील दळणवळण बंद होते. सर्वच शहरांमधील मुख्य रस्ते चौक, रेल्वे, बस स्थानके, विमानतळे अक्षरशः ओस पडली होती. दिल्ली, नोएडा, लखनौ, कोलकाता, कोची, बंगळूर, मुंबई आदी शहरांमधील मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

Video : पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादीचे खासदार राज्यातच थांबणार  
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना आहे तिथेच थांबा, दिल्लीत जाऊ नका असे निर्देश दिले आहेत. या विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी स्थानिक पातळीवर सरकारी यंत्रणेला मदत करण्याचे निर्देशही पक्षाकडून देण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसने त्यांच्या खासदारांना दिल्लीला न जाण्याचे निर्देश दिले आहेत. 

राज्यातील दहा लॉक शहरे 
नगर, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, मुंबई उपनगर, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे, यवतमाळ 

राज्यातील स्थिती 
- राज्यात ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद 
- उगाचच भटकणाऱ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा 
- मुंबईतील लोकल ३१ मार्चपर्यंत बंद, प्रवासी रेल्वेगाड्याही बंद 
- मुंबईत संशयितांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस पथके 
- घरपोच किराणा देण्याचा नाशिकमधील व्यापारी संघटनेचा निर्णय 
- आदिवासी तरुण-तरुणीचा कर्फ्यूपूर्वी मध्यरात्री विवाह 

एकाच दिवसात तिघांचा मृत्यू 
आज देशात प्रथमच एकाच दिवसामध्ये तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मुंबई, पाटणा आणि सुरत या तीन शहरांमध्ये रुग्ण दगावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ही सातवर गेली असून, देशभरातील बाधितांची संख्या ३४१ वर गेली आहे. मुंबईत मरण पावलेल्या ६३ वर्षीय रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयरोगाचा आजार होता. बिहारमध्ये मरण पावलेल्या रुग्णाचे वय ३८ वर्षे होते. हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच कतारहून भारतामध्ये आला होता. गुजरातमधील सुरत शहरामध्ये विषाणू बाधा झाल्याने ६७ वर्षांच्या वृद्धाला प्राण गमवावे लागले. या वृद्धालाही दम्याचा आजार होता तसेच त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seventyfive districts of the country lock