
Uttar Pradesh : ३० हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या; दाट धुक्यामुळे भीषण अपघात
उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथं आज सकाळी दाट धुक्यामुळे जवळपास तीस गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना घडली आहे. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर ही घटना घडली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या एक्सप्रेस वेवरुन गाड्या वेगाने जात होत्या. मात्र त्यातच एका गाडीने ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकत गेल्या आणि हा अपघात झाला. या एक्सप्रेसवेच्या आजूबाजूच्या गावात ही माहिती मिळताच तिथले गावकरी मदतीसाठी आले.
गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी एका कारने ब्रेक मारल्याने त्याच्या मागून येणाऱ्या एका छोट्या कंटेनरच्या ड्रायव्हरनेही ब्रेक मारला आणि त्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या मोठ्या आकाराच्या कंटनेरने धडक दिली आणि बाजूने पुढे निघून गेला. यानंतर मात्र मागून येणाऱ्या इतर गाड्याही एकमेकांना धडकल्या.
हा अपघात दाट धुक्यामुळे झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये एक स्कूलबसही होती. यामधले बरेच विद्यार्थीही जखमी झाले आहेत, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.