Sharad Pawar News : 'त्या' पत्रावर पहिली सही माझी, PM मोदींनी आम्हाला…; सिसोदियांसाठी शरद पवार मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar on  9 opposition leaders writing to PM alleging misuse of central agencies  Kejriwal govt

Sharad Pawar News : 'त्या' पत्रावर पहिली सही माझी, PM मोदींनी आम्हाला…; सिसोदियांसाठी शरद पवार मैदानात

केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त पत्र लिहिले आहे. दरम्यान या पत्रावर पहिली सही ही माझी आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. केंद्रातील भाजप सरकारकडून सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते .

यावेळी शरद पवार यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयांवर झालेल्या कारवाईचा देखील संदर्भ दिला. शरद पवार म्हणाले की, त्या पत्रातील पहिली सही माझी आहे. पंतप्रधानांनी आमच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे. उदाहरणार्थ, केजरीवाल सरकारमध्ये ज्या व्यक्तीने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आणि अनेकांनी त्याचे कौतुक केले त्यांना अटक केली जात आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

विरोधकांकडून पंतप्रधानांना लिहिलेले हे पत्रामध्ये बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव, जेकेएनसी प्रमुख फारुक अब्दुल्ला, एआयटीसी प्रमुख ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे प्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे.

हेही वाचा - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

पत्रात काय म्हटलंय?

भाजपशासित केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी पत्रांद्वारे केला आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीच्या गैरवापराचा विरोधी पक्षनेत्यांनी निषेध केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्राद्वारे म्हटले आहे की, केंद्राची तपास यंत्रणा भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांवर संथगतीने कारवाई करत आहे.

पत्रात लिहिले आहे की, आम्हाला आशा आहे की भारत अजूनही लोकशाही देश आहे हे तुम्ही मान्य कराल. केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या सदस्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. आपण लोकशाहीतून हुकुमशाहीकडे जात आहोत, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.राज्यपाल आणि राज्य सरकारमधील वादही विरोधी पक्षनेत्यांनी पत्रात नमूद केले आहेत.

विरोधकांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिसोदिया यांना राजकीय षड्यंत्राखाली अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील शालेय शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी सिसोदिया जगभरात ओळखले जातात. 2014 पासून तपास यंत्रणांनी विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असल्याचे देखील विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.