‘इंडिया’ आघाडीत अखिलेशचा खोडा?

समाजवादी पक्ष हा मध्य प्रदेशातच जन्माला आला आणि तिथे तो बलशाली आहे. असे असतानाही अखिलेश यादव यांनी मध्यप्रदेशातील काही जागांवर दावा केला.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavesakal

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे ‘इंडिया’ आघाडीमध्ये खोडा घालतील का? मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाला त्यांनी मागणी केलेल्या जागा देण्यास नकार दिला. यामुळे अखिलेश यादव यांनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे, म्हणून हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘इंडिया’ आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद होतील, असे पूर्वानुमान काढले जात होते.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपाबाबत झालेल्या संघर्षाच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही शंका खरी होताना दिसत आहे. ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्षांमधील हा संघर्ष राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच सुरू झाला होता.

समाजवादी पक्ष हा मध्य प्रदेशातच जन्माला आला आणि तिथे तो बलशाली आहे. असे असतानाही अखिलेश यादव यांनी मध्यप्रदेशातील काही जागांवर दावा केला. अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाने मागेही मध्य प्रदेश आणि राजस्थानातील काही जागांवर निवडणूक लढवली होती. अखिलेश आणि काँग्रेसमधील संघर्ष तेव्हा सुरू झाला, जेव्हा २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशात अखिलेश यांनी नऊ जागांवर दावा केला.

२०१८ मध्ये मध्यप्रदेशात समाजवादी पक्षाचा एक आमदार निवडून आला होता. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी अखिलेश यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. काँग्रेसने जागा न दिल्याने अखिलेश यांनी नऊ मतदारसंघांमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार घोषणा केली आणि कमलनाथ यांनीही २३० जागांपैकी २२९ जागांवर उमेदवारांची घोषणा केली. यामुळे संतापलेल्या अखिलेश यांनी आणखी २२ उमेदवारांची घोषणा केली.

यातून ‘इंडिया’ आघाडीतील संघर्ष उघडपणे दिसून आला. अशातच अखिलेश यांनी जाहीरपणे काँग्रेसवर टीका केली. यामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ‘इंडिया’आघाडीवर टीका करण्याची आयती संधी मिळाली. वास्तविक हा संघर्ष तत्काळ मिटविण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यावर चर्चा करणे आणि विवेकाने निर्णय घेणे अभिप्रेत आहे.

त्यादृष्टीने काही हालचाली चालू असल्याचेदेखील बोलले जात आहे. परंतु असे मानले जाते की, खरोखरच काँग्रेसने मध्यप्रदेशात समाजवादी पक्षाची चार किंवा पाच जागांवर बोळवण केली असता, अखिलेश खरोखरीच त्यांचे ३१ उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत.

दबावतंत्राचा भाग?

मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाला मध्यप्रदेशात एका जागेवर यश मिळाले होते, त्याचप्रमाणे चार जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. या आधारावर समाजवादी पक्षाकडून अधिक जागांची मागणी केली जात आहे.

अखिलेश यादव यांची मध्यप्रदेशातील नऊ जागांची मागणी केवळ मध्यप्रदेशात पक्षाचे अस्तित्व दिसावे अथवा चर्चेत राहावे एवढ्याचसाठी नसून आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जागावाटपाच्या दृष्टीने हे दबावतंत्र असल्याचेदेखील बोलले जात आहे. समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी, 'उत्तर प्रदेशामध्ये वर्तमानात काँग्रेसचा केवळ एकच खासदार आहे" असे सूचक वक्तव्यही केले आहे.

अर्थात हे विधान करत असताना लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून समाजवादी पक्षाचेदेखील पाचपेक्षा अधिक उमेदवार नाहीत, याकडे समाजवादी पक्ष दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर अखिलेश यादव हा संघर्ष ताणून धरतील, ज्यामुळे ‘इंडिया’आघाडीसमोर अडथळा उत्पन्न होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अखिलेश यांच्या मागणीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्यानंतर अखिलेश यांनी संताप व्यक्त करत, ‘इंडिया आघाडी ही केवळ राष्ट्रीय स्तरावर असून, राज्यपातळीवर असणार नाही, असे आधीच जाहीर केले असते तर, मी माझे प्रतिनिधी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांना पाठविले नसते' असे जाहीर विधान केले आहे.

त्याचप्रमाणे ‘ही आघाडी जर राज्यपातळीवर झाली नाही तर भविष्यात आघाडीबरोबर राहण्यात अर्थ नाही,’’अशा आशयाचे विधानही त्यांनी नुकतेच केले आहे. या संघर्षामध्ये अखिलेश ज्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत, ती गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या घोसी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न देऊन काँग्रेसचा हेतू स्पष्ट केला होता.

याउलट अखिलेश यांनीच उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसविरोधात उमेदवार उभा केला होता. इतकेच नव्हे तर अखिलेश यांनी उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना ‘चिरकुट’ असे संबोधून त्यांचा अपमान केला होता. कमलनाथ यांनी, कोण अखिलेश? असा प्रश्न उपस्थित करत अखिलेश यांचा अपमान केला होता, त्याची ही प्रतिक्रिया असल्याचेदेखील समाजवादी पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

या सर्व घडामोडींवरून ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, हे स्पष्ट होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपच्या आठ जागा कमी आल्या असूनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सर्व जागांवर विजय मिळवण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेल्या ‘इंडिया’ आघाडीतील ही धुसफूस आघाडीसाठी मोठे नुकसान करणारी ठरू शकते.

(अनुवाद : रोहित वाळिंबे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com