गुजरात निवडणूक घोषणेची चालढकल घातक: शरद यादव 

वृत्तसंस्था
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

यादव यांनी आपल्या गटाच्या जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या आज जाहीर केल्या. गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीपासून प्रकाशात आलेले छोटूभाई वसावा यांना यादव गटाचे कार्यकारी अध्यक्ष, तर राज्यसभेत यादव यांना साथ देणारे अली अल्वर अन्सारी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यास होणारा विलंब हा राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. ही चालढकल संसदीय लोकशाही व निवडणूक यंत्रणेच्या स्वायत्ततेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे, अस मत संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांनी आज व्यक्त केले. भाजप अध्यक्षांच्या मुलाबाबत बोलताना यादव यांनी, "भाजप स्वतःच्या शहजाद्याबद्दल "पार्टी विथ द डिफरन्स' ठरला आहे,'' असा टोला लगावला. 

यादव यांनी आपल्या गटाच्या जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या आज जाहीर केल्या. गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीपासून प्रकाशात आलेले छोटूभाई वसावा यांना यादव गटाचे कार्यकारी अध्यक्ष, तर राज्यसभेत यादव यांना साथ देणारे अली अल्वर अन्सारी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांची नावेही त्यांनी जाहीर केली. यादव यांनी निवडणूक आयोगाककडे "जदयू'च्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यांच्या गटाने 429 खासदार आमदार व इतरांची प्रतितज्ञापत्रेही जोडली होती. त्यावर नितीशकुमार यांच्या गटानेही निवडणूक आयोगाककडे धाव घेतली. 

यादव यांनी नितीशकुमारांची साथ सोडल्यावर लालूप्रसाद व कॉंग्रेसचा हात धरला आहे. गुजरात निवडणूक घोषणा विलंबाने होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असल्याचे सांगून यादव म्हणाले, "राजकारणात अहंकार व घमेंड यांना स्वपक्षीय एकवेळ सहन करतील; पण जनता फार काळ सहन करत नाही. देशाच्या इतिहासात एखाद्या निवडणुकीच्या घोषणेस इतका विलंब पहिल्यांदाच होत आहे, हे बरे नाही. जनतेचा निवडणूक आयोगावर प्रदीर्घ काळ विश्‍वास आहे. या घटनात्मक संस्थेची विश्‍वासार्हता जपणे ही सत्ताधाऱ्यांची पहिली जबाबदारी आहे.'' 

दरम्यान, यादव व अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्व संपुष्टात आणण्यासाठी नितीशकुमार गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यादव यांनी याबाबत काल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडूंकडे बाजू मांडली. यानंतर 30 ऑक्‍टोबरला ते नायडू यांना पुन्हा भेटतील. हिवाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत या प्रकरणाचा निपटारा करण्याच्या सरकारच्या हालचाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Yadav statement on Gujrat assembly election