सोनिया गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता धुरा कुणाकडे?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 August 2020

काँग्रेस कार्यकारिणीच्या काही आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष देण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्येही या मागणीने जोर धरला होता. 

नवी दिल्ली: गतवर्षी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष बनल्या. सोनिया हंगामी अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाल सोमवारी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस नेते शशी शरुर यांनी पक्षातील दिशाहीनता दूर करण्याचं आवाहन केले आहे. तसेच राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसतील, तर ते दुसऱ्याकडे देण्यात यावे, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर कोण असेल याबाबत प्रश्न कायम आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला तरी तो आपोआप रिक्त होत नाही. नव्या निवडीपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्ष राहतील. पुढील प्रक्रियेबाबत लवकरच माहिती दिली जाईल. पक्षाच्या घटनेनुसार त्यांना मुदतवाढ देण्याचा मुद्दा तांत्रिक आहे. पूर्वअट म्हणून तसे निवडणूक आयोगाला अद्याप कळविण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. 

राहुल गांधींकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद द्यावे, अशी पक्षातून मागणी सुरू असताना वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी नेतृत्वाबद्दलची अनिश्चितता संपविण्याची मागणी केली असून राहुल गांधी तयार नसतील तर, लवकर दुसरा अध्यक्ष निवडा, असा सल्ला दिला आहे. अनिश्चित काळापर्यंत अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींकडून नेतृत्वाची अपेक्षा अनुचित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

सोनिया गांधींच्या अंतरिम अध्यक्षपदाला उद्या (ता. १०) एक वर्ष पूर्ण होत असताना शशी थरूर यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. थरूर यांनी म्हटले आहे, की नेतृत्त्वाबाबत आपण स्पष्ट असायला हवे. मागील वर्षी सोनिया गांधींच्या अंतरिम अध्यक्षपदी निवडीचे स्वागत केले होते. परंतु त्यांनी दीर्घकाळ त्यांनी हा भार दीर्घकाळ पेलत राहावा अशी अपेक्षा ठेवणे अनुचित आहे, असे वाटते. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘काँग्रेस पक्ष भरकटला असून प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकत नाही, ही जनतेमध्ये तयार होणारी प्रतिमा बदलण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसची दिशाहीन पक्ष ही छबी बदलण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करायला हवी,’’ असे ते म्हणाले. 

राहुल यांची इच्छा नसेल तर... 
राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत थरुर म्हणाले, की राहुल गांधींकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, नेतृत्वाची त्यांची इच्छा नसेल तर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षाने लवकरात लवकर कृती करण्याची आवश्यकता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचे स्थान निर्णायक आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या काही आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष देण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्येही या मागणीने जोर धरला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashi Tharoor demanded if Rahul Gandhi is not ready choose another president