शताब्दी रॉय आज निर्णय जाहीर करणार

पीटीआय
Saturday, 16 January 2021

आपल्या बीरभूम मतदारसंघातील पक्षाच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागला, असे रॉय यांनी फेसबुकवरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.

कोलकता - तृणमूल काँग्रेसला गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आणखी एक खासदार शताब्दी रॉय यांनी खदखद व्यक्त केली आहे. प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूलबद्दल मला समस्या असून शनिवारी यासंदर्भात निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी जाहीर केले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बंगालमध्ये  आगामी विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. जे.पी.नड्डा, अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर बंगालचे राजकीय वातावरण तापले असून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ची संख्या वाढल्याने तृणमूलच्या गोटात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, आपल्या बीरभूम मतदारसंघातील पक्षाच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागला, असे रॉय यांनी फेसबुकवरील पोस्ट मध्ये म्हटले आहे. यासंदर्भात कोणता निर्णय घेतला तर शनिवारी दुपारी दोन वाजता आपण जनतेला जाहीर करू, असे तीनवेळा बीरभूमच्या खासदार राहिलेल्या रॉय यांनी शुक्रवारी दिल्लीला जाताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की गेल्या दहा वर्षांत मी स्वत:च्या कुटुंबीयांपेक्षाही मतदारसंघाला अधिक वेळ दिला आहे. ही गोष्ट माझे शत्रूही मान्य करतील. मी पक्षनेतृत्वाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही.  पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, रॉय यांचे तृणमूलचे बीरभूम जिल्हाप्रमुख अनुब्रत मोंडाल यांच्याशी मतभेद आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहण्याची माझी इच्छा असते. मात्र, अनेक कार्यक्रमांची मला माहितीच नसते. मला माझ्याच मतदारसंघातील कार्यक्रमांबद्दल माहिती दिली जात नाही. त्यामुळे, मानसिक त्रास होत आहे.
- शताब्दी रॉय, खासदार, तृणमूल काँग्रेस

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shatabdi Roy MP Trinamool Congress will announce the decision today