अर्थसंकल्प सादरीकरणात शायरी; भाषण मात्र लांबले

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 जुलै 2019

निर्मला सीतारामन यांच्या पहिल्या अर्थसंकल्पी भाषणाबद्दल सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी बाकांवरही प्रचंड उत्सुकता होती. नेहमीप्रमाणे राज्यसभेतील खासदारांनी भाषण ऐकण्यासाठी लोकसभेच्या राखीव सज्जात हजेरी लावली होती.

नवी दिल्ली : 'यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट भी लेकर चराग जलता है,' या उर्दू शायरीच्या पंक्तींद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या कार्यपद्धतीची झलक काल (शुक्रवार) अर्थसंकल्पीय भाषणाच्या निमित्ताने संसदेत सादर केली. मात्र अर्थमंत्री या नात्याने त्यांचे पहिलेच भाषण तब्बल सव्वादोन तास लांबल्याने रुक्ष आणि एकसुरी ठरले. 

निर्मला सीतारामन यांच्या पहिल्या अर्थसंकल्पी भाषणाबद्दल सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी बाकांवरही प्रचंड उत्सुकता होती. नेहमीप्रमाणे राज्यसभेतील खासदारांनी भाषण ऐकण्यासाठी लोकसभेच्या राखीव सज्जात हजेरी लावली होती. प्रथेप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वीची मंत्रिमंडळाची बैठक होऊन निर्मला सीतारामन या पंतप्रधानांसोबतच मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांसमवेत लोकसभेचे कामकाज सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी सभागृहात पोचल्या होत्या. अर्थसंकल्पी भाषण ब्रिफकेसमधून आणण्याची प्रथा आहे. परंतु सीतारामन यांनी ती बाजूला सारताना भारतीय राजमुद्रांकित लाल पिशवीतून भाषणाचे दस्तावेज आणून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. लोकसभा निवडणुकीतील सरकारचे यश, मोदींच्या नेतृत्वाबद्दलची स्तुतिसुमने आणि अर्थसंकल्पातील नव्या घोषणांना सत्ताधारी खासदार बाके वाजवून दाद देत होते. मात्र त्यांच्या उत्साहाला अखेरी ओहोटी लागली होती. 

अर्थमंत्र्यांनी सरकारचा निर्धार व्यक्त करण्यासाठी सादर केलेल्या 'हवा की ओट भी लेकर चराग जलता है,' उर्दू शायरीच्या ओळींसोबत शीघ्रकवी रामदास आठवलेंनी "इसलिये वोट भी मिलता है,' असे म्हणून साधलेल्या यमकामुळे काहीशी पिकलेली खसखस तसेच तृणमूल कॉंग्रेसचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांची तुरळक शेरेबाजी वगळता अर्थमंत्र्यांच्या दोन तास दहा मिनिटांपर्यंत चाललेल्या भाषणादरम्यान विरोधी बाकांवरील खासदार पुरते थंडावल्याचे दिसून आले. अपवाद फक्त पेट्रोल, डिझेलवर उपकर आकारण्याच्या घोषणेला झालेल्या विरोधाचा. 
हिंदीवर प्रभुत्व नसलेल्या निर्मला सीतारामन यांनी एक शुद्ध हिंदीतून परिच्छेद वाचून संपूर्ण सभागृहाची दाद मिळवली. एवढेच नव्हे तर हा परिच्छेद पूर्ण होताच स्वतः निर्मला सीतारामन यांनीही सुटकेचा निःश्‍वास टाकला होता! कररचनेचा उल्लेख करताना त्यांनी तमीळ कवी पुरा नन्नुरू यांच्या 'यन्नाई पुगुन्धा नीलम' या दीर्घ काव्यातील सादर केलेल्या तमीळ पंक्तींनी विरोधी बाकांवरील द्रमुकच्या खासदारांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानिमित्ताने कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी द्रमुक सदस्यांना, किमान आता तरी अर्थमंत्र्यांना दाद द्या, अशा आशयाचे केलेले आवाहनही हशा पिकवणारे होते. 

पाण्याचा घोटही नाही... 
सुमारे सव्वादोन तासाच्या भाषण खासदारांनी शांतपणे ऐकल्याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आभार मानले, तर निर्मला सीतारामन यांनी कोठेही न थांबता भाषण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. पाणी पिण्यासाठीही त्या थांबल्या नसल्याचा आवर्जून उल्लेख मोदींनी अभिनंदनात केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shayari in budget presentation and the lecture time limit has crossed