esakal | शिबू सोरेन यांना रांचीतून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवणार
sakal

बोलून बातमी शोधा

shibu soren

झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रांचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शिबू सोरेन यांना रांचीतून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रांची - झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रांचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांना पुढील उपचारासाठी गुरुग्राम इथं हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर रांचीमध्ये तीन डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे. त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला आहे. शिबू सोरेन आणि त्यांची पत्नी रुपी सोरेन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

शिबू सोरेन यांनी तीनवेळा झारखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर ते दोन दिवस घरीच विलगीकरणात होते. मात्र घरी प्रकृती बिघडत चालल्यानं रांचीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी दुपारपर्यंत त्यांना गुरुग्राममधील मेदांतामध्ये दाखल केलं जाईल. त्यासाठीची आवश्यक असलेली तयारी करण्यात आली आहे. 

मेदांता रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शिबू सोरेन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आज दुपारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केलं जाईल. तीन दिवसांपूर्वी त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समजलं होतं. 

हे वाचा - ‘गिलानींबद्दल अनधिकृत माहिती प्रसिद्ध करू नये’

दरम्यान, रांचीमध्ये त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीने उपचार कऱण्याची तयारी केली होती. सोमवारी मध्यरात्री रांची जिल्हा पोलिसातील लालू कुमार यादव यांनी प्लाझ्मा डोनेट केले होते. शिबू सोरेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्लाझ्मा डोनरचा शोध घेतला जात होता. 

शिबू सोरेन यांच्या पत्नीलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. शिबू सोरेन यांच्यासोबत दिल्लीला त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन जाण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.