'शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी'; संजय राऊत दिल्ली सीमेवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 2 February 2021

कृषी कायद्यांना परत घेण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता 6 फेब्रुवारीला देशभरात चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- कृषी कायद्यांना परत घेण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता 6 फेब्रुवारीला देशभरात चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर विरोधी पक्ष शेतकरी आंदोलनात वातावरण निर्मित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूवीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत हेही उपस्थित आहेत. 

संजय राऊत यांनी ट्विट करुन शेतकऱ्यांची मंगळवारी दुपारी 1 वाजता दिल्ली सीमेवर जाऊन भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये शेतकरी आंदोलन जिंदाबाद. जय जवान जय किसान असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांची भेट घेतली. एनएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकाआघाडी सरकार बनलं आहे. शिवसेनेची कृषी कायद्यांबाबतची भूमिका सुरुवातीला संदिग्ध होती. पण, शेवसेनेने आता उघडपणे कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारला चांगलेच सुनावलं आहे. सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.   

'मोदीजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?' प्रियंका गांधींची पंतप्रधानांवर...

दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोनहून अधिक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला निषेध तीव्र केला आहे. प्रजासत्ताक दिनाला काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना सरकारला धक्के द्यायला सज्ज झाली आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील जमीनीवर मोठमोठे खिळे लावून रस्ता बंद केला आहे. जेणेकरुन आंदोलनस्थळी जाणे-येणे आणि वाहतुक पूर्णपणे बंद व्हावी. या साऱ्याचा रोष व्यक्त करत कृषी कायदे रद्दबातल व्हावेत, म्हणून शेतकऱ्यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांकडून देशभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे. या चक्का जाममध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहतुक अडवण्यात येणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut Rakesh Tikait Ghazipur