राफेल जेट उडवणारी पहिली महिला पायलट बनतेय शिवांगी

Shivangi Singh
Shivangi Singh

नवी दिल्ली : 'युद्धात लढणं काही बायकांचं काम नाही...' या प्रकारची पुरुषी मानसिकता असलेली वाक्यं-म्हणी आता विसरा. याचं कारण आहे की, योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यावर पुरुषांइतकीच चमकदार कामगिरी महिलाही करु शकतात हे आपल्या कर्तुत्वातून आजवर अनेक महिलांनी सिद्ध केलं आहे. वर्षानुवर्षे असलेली सारी बंधने तोडत महिला आता नवा इतिहास लिहत आहेत. भारतीय सैन्यात आता महिलादेखील आपली चमकदार कामगिरी बजावण्यास सज्ज झाल्या आहेत. अशीच एक कहाणी लेफ्टनंट शिवांगी सिंहची! फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह ही जगातील सर्वोत्तम श्रेणीतील मानल्या गेलेल्या विमानातील एक विमान म्हणजे राफेलची पहिली महिला पायलट बनणार आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाची आणखी एक महिला भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट बनली होती, हा योगायोगच मानावा लागेल. 

कन्व्हर्जन ट्रनिंग पूर्ण झाल्यावर बनेल राफेलची पायलट
कन्व्हर्जन ट्रनिंग पूर्ण झाल्यावर ती वायुसेनेच्या अंबाला बेसच्या 17 गोल्डन एरोज स्क्वॅड्रनमध्ये ती सामील होईल. एखाद्या पायलटला एका फायटर जेटमधून दुसऱ्या फायटर जेटला स्वीच होताना कन्व्हर्जन ट्रनिंग घ्यावी लागते. मिग 21 एस मधून उड्डाण केलेल्या शिवांगीसाठी राफेल उडवणे ही काही फार मोठी गोष्ट नसेल. याचं कारण असं की, मिग विमान 340 किमी प्रति तासच्या वेगाने उड्डाण करणारे जगातील सर्वात वेगवान लँडीग आणि टेक-ऑफ स्पीडचे विमान आहे. 


BHU मधून शिवांगीचे शिक्षण पूर्ण
शिवांगी सिंह ही उत्तर प्रदेशातील वाराणसीची मूळ रहिवासी आहे. शिवांगीने बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. महिला पायलटांच्या दुसऱ्या बॅचमध्ये ती होती. भारतीय वायुसेनेत फायटर प्लेन उडवणाऱ्या 10 महिला पायलट आहेत ज्या सुपरसोनिक जेट्स उडवण्याच्या अत्यंत कठीण ट्रनिंग पार करून पायलट बनल्या आहेत. एका पायलटच्या ट्रेनिंगला 15 करोड रुपयांचा खर्च येतो. 


अभिनंदन वर्धमान यांच्यासोबतही उडवलं आहे मिग फायटर प्लेन
शिवांगी सिंह या आधी राजस्थानमधील फॉरवर्ड फायटर बेसवर तैनात होती. तिथे त्यांनी विंग कंमाडर अंभिनंदन वर्धमानसोबतही उड्डाण केलं आहे. बालाकोट एअरस्ट्राइकनंतर भारतीय हवाई सीमेत घुसखोरी करू पाहणाऱ्या पाकिस्तानी फायटर जेटचा पाठलाग करणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान पाकिस्तानच्या सीमेत जाऊन पडलं होतं. पाकिस्तानने त्यांना बंदी बनवलं होतं. परंतु, आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला सम्मानासहित त्यांना परत पाठवावं लागलं होतं. 


फायटर जेट उडवणाऱ्या महिलांची पहिली बॅच

फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत आणि फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह भारतीय वायुसेनेत फायटर जेट उडवणाऱ्या महिला पायलटांच्या पहिल्या बॅचमध्ये समाविष्ट होत्या. त्यांना जून 2016 मध्ये पहिल्या टप्प्यातील ट्रेनिंग दिली गेली होती. युद्धात फक्त पुरुषच लढू शकतात या पुर्वापार चालत आलेल्या मानसिकेला उधळून लावत महिलाही काही कमी नाहीत हेच या साऱ्या महिलांनी आपल्या कर्तुत्वातून सिद्ध केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com