राम मंदिरासाठी शिवसेनेनं दिले एक कोटी रुपये; ट्रस्टच्या खात्यावर जमा झाली रक्कम

सकाळ
Monday, 3 August 2020

राम मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलं की, ट्रस्टच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे पैसे महाराष्ट्रातून आले आहेत.

अयोध्या - अयोध्येत राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमानिमित्त सोमवारपासून तीन दिवसांच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी माहिती दिली. राम मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलं की, ट्रस्टच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे पैसे महाराष्ट्रातून आले आहेत. जी स्लिप आमच्याकडे आली त्यावर शिवसेना असं लिहिलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 60 व्या वाढदिवशी ही रक्कम ट्रस्टच्या खात्यावर पाठवण्यात आली होती. 

विकास प्राधिकरणाकडून 70 एकर जमिनीचा नकाशा तयार झाला आहे. त्याचे पैसे आम्ही चेकद्वारे देणार आहोत. प्राधिकरणाला एक ते दोन करोड रुपये द्यावे लागणार आहेत. 1996 साली आम्ही विचारही केला नव्हता की आम्हाला 70 एकर जमीन मिळेल. बांधकामासाठी कार्यशाळेमध्ये ठेवण्यात आलेली दगडे आधी वापरली जातील अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे.

हे वाचा - अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

चंपत राय म्हणाले की, भूमीपूजनासाठी अनेक संत आयोध्येमध्ये आले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व लोक येतील. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी देशातील 36 अध्यात्मिक परंपरांमधील 135 संतांना निमंत्रण पाठवलं आहे. 

श्रीराम मंदिर तिर्थ क्षेत्राच्यावतीने सांगितलं की, आयोध्येत राहणाऱ्या त्या कुटुंबातील सदस्यांनाही बोलावण्यात आलं आहे ज्यांच्या कुटुंबातील मुलं गोळीबारात ठार झाली होती. तसंच शिख, बौद्ध, आर्यसमाज, जैन, शैव, वैष्णव पंरपरेतील लोक भूमीपूजनासाठी येतील. यामध्ये इकबाल अन्सारी यांनाही बोलावण्यात आलं आहे. ज्यांना बोलावणं शक्य नाही त्यांची फोनवरून क्षमाही मागितली असल्याचं चंपत राय म्हणाले. वय जास्त असलेल्यांच्या आरोग्याचा विचार करून बोलावण्यात आलेलं नाही. तसंच जे चातुर्मासात येऊ शकत नाहीत त्या साधुंना बोलावलेलं नाही. 1989 मध्ये ज्या दगडांचे पूजन करून पाठवण्यात आलं होतं त्यातीलच 9 दगड भूमी पूजनासाठी ठेवण्यात येतील अशी माहिती ट्रस्टने दिली.

मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  तिघांची नावे आहेत. शिवाय व्यासपीठावर केवळ पाच व्यक्ती असणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नित्या गोपालदास यांचा समावेश आहे. निमंत्रण पत्रिकेवर राम लल्लाचा फोटोही असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena donate 1 crore for ram mandir says champat rai