...तर मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील : संजय राऊत

वृत्तसंस्था
Tuesday, 3 March 2020

‘येत्या रविवारपासून मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडिया हा भाजपचा आत्मा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तो कसा काढणार. मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगाविला आहे.

‘येत्या रविवारपासून मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. डिजिटल इंडियाचा पाया रचणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी एक नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मोदींच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

मोदींच्या या निर्णयावर एएनआयशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की सोशल मीडिया ही भाजपची फौज आहे. त्यामुळे सेनापती सोशल मीडिया सोडत असेल तर परिणाम होईल. 2014 मध्ये याच सोशल मीडियामुळे भाजप सत्तेत आली होती. भाजपसाठी सायबर सेल म्हणजे फौज आहे. आता सेनापतीच सोशल मीडियापासून दूर जात असेल तर ही फौज काय करणार? भाजपने सोशल मीडियात मोठे भांडवल गुंतवले आहे. मात्र, सोशल मीडियाच्या नकारात्मक वापरामुळे काय नुकसान होऊ शकते, हे नरेंद्र मोदींना आत्ता उमगले असावे. सोशल मीडियावर यापूर्वी कधीही इतकी नकारात्मक भाषा वापरली गेली नव्हती. त्यामुळे आता प्रमुख लोकांनी पुढे येऊन नवा आदर्श निर्माण केला पाहिजे. किंबहुना राजकीय नेत्यांनी पुढील पाच वर्षे सोशल मीडिया सोडावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut criticize Narendra Modi on Social Media