"राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का?"

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना मुखपत्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना मुखपत्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात रोजगाराची स्थिती भीषण बनत चालली आहे. अनेकांचा नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे ही समस्या सुटली नाही तर लोक पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा मागू शकतात, अशी टीका राऊत यांनी केली आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे 10 करोड लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. यामुळे 40 करोड लोक प्रभावित झाले आहेत. मध्यमवर्गी लोकांची नोकरी गेली आहे. शिवाय उद्योग आणि व्यवसायात जवळजवळ 40 लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहेत, असंही ते म्हणाले आहेत. 

कोरोनामुळे एसटी सेवेला ‘ब्रेक’ लागला आणि कर्मचाऱ्यांवर आली हि वेळ

लोकांची धैर्याची एक सीमा आहे. लोक केवळ आशा किंवा वचनांवर जिवंत राहु शकत नाहीत. भलेही भगवान राम यांचा वनवास पूर्ण झाला असेल, पण सध्याची स्थिती गंभीर आहे. कोणीही याआधी स्वत:ला इतकं असुरक्षित अनुभवलं नव्हतं. दोन दिवसांपूर्वी देशात 5 राफेल लढाऊ विमाने अंबाला हवाईतळावर दाखल झाली. त्यामुळे आजपासच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला. देशात राफेल आधी सुखोई आणि एमआईजी लढाऊ विमानेही भारतात आली आहेत, पण अशा प्रकारचा उत्सव कधीही साजरा करण्यात आला नाही, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे. 

अत्याधुनिक उपकरणे आणि क्षेपणास्त्राणे युक्त असलेल्या राफेल विमानामध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का? असा रोखठोक सवाल राऊतांनी विचारला आहे. राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. राज्यात राष्ट्रपती शासन लागू होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर म्हणतात की रोज हनुमान चालीसा वाचल्याने कोविड-19 महामारी नष्ट होऊन जाईल, असं म्हणत राऊतांनी टीका केली.

वास्तवापासून मोदी सरकार दूरच

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणतात, महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल. देशातील संकटाविषयी, रोजगाराविषयी कोणीही बोलत नाही. संकटात संधी मिळते असं म्हणणं सोपं आहे, पण लोक संकटांचा सामना कसा करत आहेत याची कुणाला काळजी नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात निदर्शने होत आहेत. कोरोना विषाणू महामारी आणि आर्थिक संकट हाताळण्यात अपयश येत असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भारतातही असंच काहीतरी पाहायला मिळू शकतं, असं म्हणत राऊत यांनी निशाणा साधला.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena sanjay raut criticize bjp on rafale landing