esakal | युतीला अधिकृत तडा; 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेनेची दांडी

बोलून बातमी शोधा

युतीला अधिकृत तडा; 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेनेची दांडी

- राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवीन आघाडी उदयास येत आहे.

युतीला अधिकृत तडा; 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेनेची दांडी
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपने उद्या (ता. 17) नवी दिल्लीत बोलावलेल्या "एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने भाजप- शिवसेना युतीला अधिकृत तडा गेल्याचे मानण्यात येते. 
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवीन आघाडी उदयास येत आहे. अशातच उद्या "एनडीए'च्या घटकपक्षांची बैठक होणार आहे; पण तिला शिवसेना उपस्थित राहणार नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन असल्याने उद्या शिवसेनेचे खासदार "एनडीए'च्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच, उद्या सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही दिल्लीत बैठक होईल. या बैठकीलाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.

आधी उद्धव या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; पण उद्या बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्याने तेही या बैठकीला जाणार नाहीत. सोनिया गांधी व शरद पवार किमान समान कार्यक्रम ठरवतील अशी माहिती आहे. 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज "यारों नये मौसम ने ये एहसास किया है। याद मुझे दर्द पुराने नहीं आते । - बशीर बद्र' असे ट्विट करून भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. नवीन घडणाऱ्या सत्तासमीकरणांमुळे जुन्या राजकारणावर पांघरूण पडले आहे. यापूर्वी असलेल्या भाजप व शिवसेनेच्या युतीबाबतच हे वक्तव्य राऊतांनी केले असेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यातील सत्तेसाठी तीन पक्षांची मोट बांधण्याची प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेने "एनडीए'मधून सर्वप्रथम बाहेर पडावे अशी मागणी कॉंग्रेसने केली होती, त्यानुसार शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. आता "एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकृतपणे युतीला तडा गेल्याचे मानण्यात येते.

आता फक्‍त औपचारिकता : राऊत 

"एनडीए'च्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला आलेले नाही, शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही जाणार नाही, त्यामुळे आता "एनडीए'मधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

ते म्हणाले, की "एनडीए' कुणाच्या मालकीची नाही. शिवसेना, अकाली दल हे "एनडीए'चे संस्थापक आहेत. "एनडीए'चे सध्याचे सूत्रधार आहेत ते त्या वेळी नव्हते. आम्हाला "एनडीए'तून दूर होण्यासाठी राज्याची राजकीय परिस्थिती कारण आहे. स्वाभिमानासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत, असा दावा करून आता बाहेर पडलो नसतो, तर राज्यातील जनतेने आम्हाला माफ केले नसते, असे राऊत म्हणाले.