नव्या वर्षात कर्नाटक सरकारला शॉक?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिल्लीत रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कर्नाटकातील युती सरकार आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र आता लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिल्लीत रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कर्नाटकातील युती सरकार आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र आता लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

नव्या वर्षाच्या प्रारंभी कॉंग्रेस-धजद युती सरकारला शॉक देण्याची तयारी भाजपने चालविली आहे. मंत्रिपदावरून हाकालपट्टी केल्यानंतर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपला साथ देऊ केली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी, राज्यातील युती सरकार पक्षांतर्गत कलहातून कोसळल्यास शांत बसायला आपण राजकीय संन्याशी नसल्याचे सांगून भाजपने सरकार स्थापन्याची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले. 

मंत्रीमंडळातून कमी करण्यात आलेले अपक्ष आमदार आर. शंकर, आमदार बी नागेंद्र यांनीही रमेश जारकीहोळी यांच्याशी हात मिळवणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीवेळी रमेश जारकीहोळी यांच्यासोबत हे दोन्ही आमदार व अन्य काही आमदार होते असे समजते. ते आता इतर असंतुष्ट आमदारांची भेट घेऊन त्यांना अमित शहा यांचा संदेश देणार असून कॉंग्रेसचे आमदार 2 ते 3 टप्यात राजीनामा देणार असल्याचे समजते. त्यांना काही प्रभावी नेत्यांचीही साथ असून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजप हायकमांडने आता ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. 

रमेश जारकीहोळी यांनी आपल्या सोबत 15 आमदारांच्या सह्यांचे संमत्तीपत्र नेल्याचे समजते. आपल्या हालचाली व योजना कोणालाच कळणार नाहीत, याची खबरदारी घेऊन जारकीहोळी गट प्रयत्नशील आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यांना केलेले चर्चेचे आवाहनही त्यांनी फेटाळून लावले आहे. रमेश जारकीहोळी यांचे प्रयत्न निष्फळ ठरविण्यासाठी त्यांचे बंधू सतीश जारकीहोळी यांनी रमेश यांच्या बाजूने असलेल्या आमदारांची भेट घेऊन त्यांना पक्ष न सोडण्याची विनंती करीत आहेत. 

संन्याशी नाही : येडियुराप्पा 
आपापासातील भांडणातून राज्यातील युती सरकाराचे पतन झाल्यास हात बांधून शांत बसण्यास मी राजकीय संन्याशी नाही, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्याक्ष येडियुरप्पा यांनी आपणही सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहोत, असे अप्रत्यक्षपणे सूचविले. ते पक्षाच्या कचेरीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही कॉंग्रेसच्या कोणत्याच असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधलेला नाही. अंतर्गत वादातूनच युती सरकार कोसळेल, असे ते म्हणाले. 

अथणीच्या आमदारांची रमेश यांना साथ 
अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनीही रमेश जारकीहोळींना आपली साथ देऊ केली आहे. एकेक आमदार हळूहळू रमेश जारकीहोळी यांच्या बाजूने बोलू लागले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. अथणीचे आमदार कुमठळ्ळी यांनी उघडपणे रमेश जारकीहोळी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मी आज आणि उद्याही रमेश जारकीहोळी यांचाच समर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जारकीहोळींना काही त्रास झाल्यास खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभे रहाण्याची त्यांनी स्पष्ट घोषणा केली. 

लखन जारकीहोळी यांचा इशारा 
रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी यांनी कॉंग्रेस नेत्यांना वेळीच विचार करण्याचा इशारा दिला आहे. रमेश जारकीहोळी भाजपात जाणार हे निश्‍चित असल्याचे सांगून लखन म्हणाले, "अजूनही वेळ गेलेली नाही. रमेशचे मन वळविण्याची जबाबदारी केवळ सतीश जारकीहोळी यांच्यावर टाकून चालणार नाही. कॉंग्रेस नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या व कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shock to Karnatak government in new year