अरेच्च्या...! डोक्यावर उगवले शिंग

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहली गावात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर मागील ५ वर्षांपासून चार इंचाचे एक शिंग उगवले होते. ज्याला नुकतेच एका शस्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे.

मुंबई : लहानपणी आजी-आजोबांकडून माणसाच्या डोक्यावर शिंगे उगवण्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. मात्र, एखाद्या माणसाच्या डोक्यावर शिंग उगवलेलं तुम्ही पाहिलंय? होय, माणसाच्या डोक्यावर चार इंचाचे शिंग उगवल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहली गावात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर मागील ५ वर्षांपासून चार इंचाचे एक शिंग उगवले होते. ज्याला नुकतेच एका शस्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे.

श्यामलाल यादव असे या व्यक्तीचे नाव असून, मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्याला झालेल्या जखमेच्या जागेवर हे शिंग उगवण्यास सुरुवात झाली. त्यांनी अनेकदा हे शिंग कापले. मात्र, पुन्हा ते जैसे थेच होत असल्याने डॉक्टरांकडे याबाबत विचारणा केली. काही डॉक्टरांनी यावर काही इलाज नसल्याचे सांगितले. तर काहींनी यावरील शस्त्रक्रिया महागडी असल्याचे सांगितले. त्यातच आता सागर येथील एका खासगी रुग्णालयात श्यामलाल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून हे शिंग काढण्यात आले आहे.

श्यामलाल यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, श्यामलाल यांना दुर्मिळ असलेला सेबसियस हॉर्न नावाचा आजार झाला होता. त्यामुळे सर्वप्रथम डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले. यात हे शिंग अधिक आतमध्ये नसल्याचे आढळल्याने, डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्रक्रियेला काही तासांचा अवधी लागला मात्र, आता हे शिंग पुन्हा उगवण्याच्या कटकटीतून त्यांची सुटका झाली आहे.

चार इंच मोठे होते हे शिंग 
शस्रक्रियेद्वारे हे शिंग काढण्यात आले तेव्हा ते चार इंचाचे असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ केस आहे. 

बांग्लादेशातही आहे अशी एक व्यक्ती
मध्यप्रदेशातील श्यामलाल यांच्याप्रमाणेच बांगलादेशातही अशी एक व्यक्ती आहे. जिच्या डोक्यावर पुनःपुन्हा झाड उगवते. या व्यक्तीवरही अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र, शस्रक्रियेनंतरही या व्यक्तीच्या डोक्यावर झाड पुन्हा जैसे थेच उगवते. तर आता श्यामलाल यांच्या डोक्यावर शिंग उगवल्याची ही भारतातील पहिलीच केस समोर आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking..! horns on the head!