'ठाकूर' लिहिलेल्या बुटांची विक्री; UP पोलिसांनी मुस्लिम विक्रेत्याला घेतलं ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

व्हिडीओमध्ये आरोपी नासिर विचारताना दिसतोय की, हे शूज मी बनवतो का?

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातील एका मुस्लिम दुकानदाराविरोधात दाखल केलेल्या FIR नंतर ताब्यात घेतलं गेलं आहे. एका वेगळ्याच कारणासाठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा दुकानदार चप्पला आणि बूटचा विक्रेता आहे. या दुकानदारावर आरोप असा आहे की, या दुकानदाराने असे बूट विकले आहेत ज्या बूटाच्या सोलवर एका विशिष्ट जातीचे नाव लिहले गेले आहे. मात्र मी या बुटांची निर्मिती केली नसून यात माझी काय चूक, असे या विक्रेत्याचे म्हणणे आहे. 

नासिर असं या दुकानदाराचे नाव आहे. या दुकानदाराला एका कट्टर उजव्या संघटनेचा नेता विशाल चौहान याच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतलं गेलं आहे. नासिरवर धर्माच्या आधारावर विविध समूहांमध्ये शत्रूत्व वाढवणे, सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करणे या सहित अनेक गंभीर आरोप लावले गेले आहेत. विशाल चौहान यांच्या तक्रारीमध्ये एका निनावी बूट निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव देखील नोंदवलं गेलं आहे. 

हेही वाचा - ब्रिटनमध्ये आढळले आजवरचे सर्वाधिक कोरोनाबाधित; नव्या स्ट्रेनचा कहर
बुलंदशहर पोलिसांनी ट्विट केलंय की, आरोपीवर संबंधित कलमांच्या अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तक्रारदार सोमवारी नासिरच्या दुकानावर पोहोचला होता. तर त्याला असं एक बूट दिसलं ज्याच्या सोलवर 'ठाकूर' शब्द लिहला गेला होता. FIR मध्ये म्हटलं गेलंय की तक्रारदाराने याबाबत नाराजी दर्शवली तर नासिरने त्याला शिव्या दिल्या तसेच मारहाण देखील केली. 

मात्र, याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. यामध्ये दिसतंय की, काही लोकांच्या समूहाने दुकानदाराला घेराव घातला आहे. यामध्ये नासिर विचारताना दिसतोय की, हे शूज मी बनवतो का? तर यावर एका व्यक्तीचा प्रश्न ऐकायला मिळतो की, मग तू यांना इथे घेऊनच का आला आहेस? या व्हिडीओमध्ये कसल्याही प्रकारची शिवीगाळ आणि मारहाण दिसून येत नाहीये. 

दुसऱ्या एका ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटलंय की जर त्यांनी त्या शूज विकणाऱ्या व्यक्तीला  ताब्यात घेतलं नसतं तर ते लोक त्याच्या सोबत वाईट पद्धतीने वागले असते. या शूजची निर्मिती कोणत्या कंपनीने केलीय हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, एक मोठी कंपनी शहराच्या बाहेर आहे मोठ्या प्रमाणावर शूज निर्मिती करते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up shopkeeper detained by the police as he sells shoe with caste name in sole