ब्रिटनमध्ये आढळले आजवरचे सर्वाधिक कोरोनाबाधित; नव्या स्ट्रेनचा कहर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

लंडन : गेल्या एका वर्षापासून जगभरात कोरोना नावाच्या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नावाचा व्हायरस पसरल्यापासून आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संक्रमणाची नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 60,196 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक रुग्णांची भर या आठवड्यात झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखीन बिघडून हाताबाहेर जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी काल मंगळवारी म्हटलं की, देशात लशीकरणाशी निगडीत दररोजची आकडेवारी जाहीर केली जाईल.

हेही वाचा - ब्रिटनमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर; कोरोना संक्रमणाचा वाढला कहर

गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आला होता. हा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो. तो अधिक संसर्गजन्य आहे. हा स्ट्रेन आता इतर जगभरात देखील वेगाने पसरत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. जॉनसन यांनी माहिती दिलीय की, आतापर्यंत ब्रिटनमध्ये 13 लाख लोकांना फायझर/बायोनटेक तसेच ऑक्सफर्ड/एस्ट्राजेनेकाची लस दिली गेली आहे. 

लॉकडाऊनच्या दरम्यान या लशीकरण मोहिमेस आणखी गती आणली जाईल. त्यांनी म्हटलंय की, यामुळे सर्वाधिक संवेदनशील समूहामध्ये प्रत्येकी चार व्यक्तीमधील एका व्यक्तीमध्ये दोन ते तीन आठवड्यांच्या दरम्यानच कोरोनाशी लढण्याची चांगली प्रतिकार शक्ती निर्माण होईल. तसेच त्यांनी पुन्हा एकदा आशा वर्तवली की येत्या काही आठवड्यांतच परिस्थिती चांगली होईल. याबाबतचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले की, येणारे काही आठवडे आतापर्यंतचे कठीण आठवडे असतील मात्र माझा विश्वास आहे की आपण या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus infection in britain more than 60000 cases of a day