'इम्रान खान मोठ्या भावासारखेच!' नवज्योत सिंग सिद्धूंच्या पाकिस्तानातील वक्तव्याने नवा वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'इम्रान खान मोठ्या भावासारखेच!' सिद्धूंच्या वक्तव्याने नवा वाद

'इम्रान खान मोठ्या भावासारखेच!' सिद्धूंच्या वक्तव्याने नवा वाद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामाबाद : करतारपूर साहिब यात्रेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान यांना मोठा भाऊ म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. इमरानने माझ्यावर नेहमीच खूप प्रेम केल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धूच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार टीका केली.

हेही वाचा: 'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं' : राहुल गांधी

माध्यमांशी बोलताना पात्रा म्हणाले की, “ सिद्धूंनी पुन्हा एकदा आपले पाकिस्तानप्रेम दाखविले असून याआधीही त्यांनी बऱ्याचदा पाकिस्तानचे गुणगाण गायले आहे. काँग्रेसने हे विचारपूर्वक आखलेले कारस्थान आहे.” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार पुन्हा सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सिद्धू यांनी मागील ३४ महिन्यामध्ये राज्याला किती आर्थिक नुकसान सहन करावे लागले याचा लेखाजोखा मांडला. दोन्ही देशांनी आपल्या दारे आणि खिडक्या खुल्या कराव्यात. सध्या जगाला शांततेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सिद्धू यांचे आज पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आले. करतारपूर साहिबच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सिद्धू यांचे स्वागत केले. तत्पूर्वी सिद्धू इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील उपस्थित होते. याच सोहळ्यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्याने अनेकांनी त्यावर टीका केली होती.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

मोदी देशप्रेमी आणि सिद्धू देशद्रोही कसा? सिद्धूंचा सवाल

आताही भारतातून टीका होताच सिद्धू यांनी घूमजाव केले आहे. एखाद्या विधानाचा विपर्यास करण्याचे ठरले असेल तर त्याला कुणीही रोखू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जातात तेव्हा ते 'देशप्रेमी' असतात, जेव्हा सिद्धू जातो तेव्हा तो 'देशद्रोही' असतो... मी तुम्हाला भाऊ म्हणू शकत नाही का...? आम्ही गुरु नानक देव यांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करतो, असं त्यांनी म्हटलंय. भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांचे उदाहरण देताना सिद्धू म्हणाले की, नुसरत फतेह अली खान असो की भारतातील किशोर कुमार. ही सगळी मंडळी परस्परांना जोडणारी आहेत. पंजाबचे भवितव्य बदलायचे असेल तर पाकिस्तानसोबतचा व्यापार सुरू व्हायला हवा. मुंद्रा बंदराची सेवा घेण्यासाठी आम्ही हजारो किलोमीटर दूर कशासाठी जायचे? पंजाब आणि पाकिस्तानादरम्यानचे अंतर फक्त २२ किलोमीटरचे आहे.

loading image
go to top