esakal | सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर केले एअरलिफ्ट

बोलून बातमी शोधा

cryogenic oxygen tanker

सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर केले एअरलिफ्ट

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली/सिंगापूर - देशभरात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना आणि दवाखान्यात ऑक्सिजनची टंचाई भेडसावत असताना आज सिंगापूरहून चार क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर एअरलिफ्ट करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी पश्‍चिम बंगालच्या पनागड हवाईतळावर चार क्रायोजेनिक कंटेनर दाखल झाले.

भारतात ऑक्सिजनची टंचाई तीव्र जाणवू लागल्याने कोविड बाधित रुग्णाची स्थिती शोचनिय झाली आहे. त्यामुळे सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यादरम्यान, सिंगापूरने भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.यानुसार सिंगापूर दुतावासाने ट्विट करत म्हटले की, कोरोनाविरोधातील लढाईत आम्ही भारतासमवेत आहोत. आज सकाळी सिंगापूरच्या चांगी विमानतळावरुन चार क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर हे भारतीय हवाई दलाच्या विमानातून एअरलिफ्ट करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने काल जर्मनीहून २३ मोबाईल ऑक्सिजन उत्पादन संयंत्र आणले जात असल्याचे सांगितले होते. ही यंत्रणा कोविडच्या रुग्णांसाठी एएफएमएस रुग्णालयात तैनात केली जाणार आहे.

हेही वाचा: भारत बायोटेकनं जाहीर केली 'कोव्हॅक्सिन'ची किंमत; सीरमच्या लसीपेक्षा आहे दुप्पट दर

त्याचवेळी भारतातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जगभरातील नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताच्या नागरिकांसमवेत आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे.

भारताला रुग्णवाहिका देण्याची तयारी

इस्लामाबाद ः पाकिस्तानमधील सामाजिक संस्था ‘निधी वेल्फेअर ट्रस्ट’ने ३० रुग्णवाहिका भारतात पाठविण्याची तयारी दाखविली आहे. ट्रस्टचे प्रमुख फैसल निधी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे भारतावर गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, याचे दुःख होत आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी ५० रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथक पाठविण्याची आमची तयारी आहे, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र शाह महमूद कुरेशी यांनीही कोरोनाच्या साथीला तोंड देत असलेल्या भारतीय नागरिकांना माझे सर्व सहकार्य असेल, अशी ग्वाही दिली आहे.