मंजू वर्मा यांचा अखेर राजीनामा; पतीचे ठाकूरशी संबंध असल्याचे उघडकीस 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे त्यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा सोपविला. 
 

पाटणा- बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे त्यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा सोपविला. 

मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याशी मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्‍वर वर्मा यांचे संबंध असल्याचा आरोप होत आहे. सहा महिन्यांत या दोघांचे मोबाईल फोनवर 17 वेळी बोलणे झाल्याचे "सीडीआर'मधून स्पष्ट झाल्यानंतर मंजू वर्मा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी नितीशकुमार सरकारवर दबाव आणला होता. यापूर्वी मंजू वर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी नितीशकुमार यांनी फेटाळून लावली होती. बालिकागृहातील 34 मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर चंद्रेश्‍वर वर्मा या बालिकागृहात नेहमी येत असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा राजीनामा देण्याऐवजी आपण मागासवर्गातील असल्याने आपल्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप मंजू वर्मा यांनी केला होता. अखेर त्यांचे पती व ठाकूर सतत एकमेकांच्या संपर्कात होते, हे उघडकीस आल्याने नितीशकुमार सरकार एक पाऊल मागे आले होते. 

ठाकूरवर शाई फेकली 
ब्रजेश ठाकूर व अन्य नऊ आरोपींनी सुनावणीसाठी मुझफ्फरपूरमधील "पॉस्को' न्यायालयासाठी आज आणताना काही महिलांनी त्याला काळे फासण्याचा प्रयत्न केला. या वेळी उडालेल्या गोंधळात कोणी तरी त्याच्यावर शाई फेकली. या महिला पप्पू यादव याच्या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याचे सांगण्यात आले. ठाकूरभोवती सुरक्षाव्यवस्था असतानाही ती भेदत या महिलांनी त्याच्यापर्यंत पोचत त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातून तुरुंगात परतत असताना, ठाकूर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलला. आगामी लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्याची त्याची इच्छा होती. यासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात होती. या कारणांमुळेच मला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्याने या वेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social welfare minister Manju Verma resigns