Solar Eclipse 2021 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज, कुठं दिसेल अन् काय काळजी घ्यावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solar eclipse

Solar Eclipse 2021 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज, कुठं दिसेल अन् काय काळजी घ्यावी?

नवी दिल्ली : चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो, त्या स्थितीला सूर्यग्रहण (solar eclipse) म्हणतात. हेच या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (१० जून) (first solar eclipse in 2021) दिसणार आहे. यावेळी रिंग ऑफ फायर (ring of fire) देखील दिसणार आहे. सूर्यास्ताच्या काही मिनिटांपूर्वी लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये अंशतः सूर्यग्रहण (partial solar eclipse) दिसेल. तसेच देशाच्या इतर भागात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे आपल्या देशावर या सूर्यग्रहणाचा परिणाम होणार नाही. (solar eclipse 2021 annular solar eclipse will seen some part of india)

हेही वाचा: चक्रीवादळांचा अंदाज लवकर समजणार

ही एक खगोलीय घटना असून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात, तेव्हा हे सूर्यग्रहण दिसते. मात्र, चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षामुळे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्याच्या बाहेरचा भाग दिसतो. त्याचमुळे रिंग ऑफ फायर देखील दिसते. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील काही भागातून दिसणार आहे.

भारतात हे सूर्यग्रहण अंशतः दिसणार आहे. फक्त अरुणाचलप्रदेश आणि लडाख या ठिकाणावरूनच सूर्यास्ताच्या काही मिनिटांपूर्वी हे सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे उर्वरीत देशातील खगोलप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. लडाखमध्ये काही वेळासाठी सूर्यग्रहण दिसणार असून हे अरुणाचलप्रदेशपेक्षा जास्त उंचीवर असेल, असेही खगोलशास्त्रज्ञांचं मत आहे. अरुणाचलप्रदेशतील दिबांग वन्यजीव अभयारण्यातून जवळपास ५ वाजून ५२ मिनिटांनी काही वेळासाठी हे सूर्यग्रहण दिसेल. तसेच उत्तर लडाखमध्ये सूर्यास्ताच्या अगदी काही मिनिटांपूर्वी शेवटचं सूर्यग्रहण पाहता येईल.

हेही वाचा: जगातील पहिला कोविडमुक्त देश ठरल्याची इस्राईलची घोषणा!

कधी सुरू होणार सूर्यग्रहण? -

अंशिक सूर्यग्रहण हे १ वाजून ४२ मिनिटांनी लागणार असून ग्रहणाचा मध्य ५ वाजून ३ मिनिटांनी होणार आहे. हे सूर्यग्रहण ६.४१ मिनिटांनी समाप्त होईल. हे सूर्यग्रहण तब्बल ५ तास चालणार आहे, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रिंग ऑफ फायर कुठून पाहायला मिळणार? -

या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर'ही म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमधयेतो तेव्हा अशा प्रकारचे सूर्यग्रहण दिसते. रिंग ऑफ फायर हे रशिया, ग्रीनलँड आणि उत्तर कॅनडा येथून पाहायला मिळणार आहे. दरम्यान, युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, अंटालिका या भागातून अंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे.

सूर्यग्रहण पाहताना घ्या काळजी -

हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघितल्यास डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बॉक्स प्रोजेक्टर, दुर्बिण, टेलिस्कोपच्या सहाय्याने सूर्यग्रहण पाहण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण हे ४ डिसेंबर २०२१ ला दिसणार आहे.