काँग्रेस नेत्यांच्या पत्रानंतर सोनिया गांधींनी घेतला मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

काँग्रेसमधील २० पेक्षा अधिक बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली होती.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाच्या प्रमुख पदावरुन पायउतार होणार असल्याचं कळत आहे. काँग्रेसमधील २० पेक्षा अधिक बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली होती. त्यानंतर सोनिया गांधी लवकरच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांनी काँग्रेस नेत्यांना अध्यक्ष निवडण्यास सांगितलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
 

काँग्रेस पक्षामध्ये सध्या अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा बनल्या. सोनिया आरोग्याच्या कारणास्तव सक्रीय नाहीत. त्यामुळे पक्षाची हानी होत असून पक्षात मोठे बदल करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.  काँग्रेस नेत्यांनी पत्रात पक्षासाठी पूर्णवेळ आणि सक्रिय असणाऱ्या नेत्याची निवड करण्याची मागणी सोनियांपुढे केली आहे. उद्या (ता. २४) काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्ष नेतृत्वाबाबत चर्चा होणार असून सोनिया गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी यांनी प्रभारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास पुढील अध्यक्ष कोण, याबाबत उत्सुकता कायम आहे. काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीद्वारे पद भरण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांना अध्यक्ष म्हणून पाहणारा गटही सक्रिय आहे. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वीच अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाबाबतचा संभ्रम कायम आहे. उद्याच्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधीच प्रभारी अध्यक्षा राहणार आहेत. काँग्रेसमधील अमरिंदरसिंग आणि भूपेश बघेल या नेत्यांची सोनिया गांधी याच अध्यक्षा असाव्यात अशी इच्छा आहे.

काँग्रेसमध्ये फुटलेला 'लेटर बॉम्ब' काय आहे? वाचा राहुल, प्रियंका...
 

सोनिया गांधी यांच्या प्रभारी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यानंतर काँग्रेसमधून नेतृत्व बदलाची मागणी सुरु झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदिप सुरजेवाला यांनी यापूर्वी राहुल गांधी हेच अध्यक्ष होतील, असं सूचित केलं होतं. पक्षातील १०० टक्के कार्यकर्त्यांना असं वाटतं की राहुल गांधी हेच अध्यक्ष व्हावेत. रणदिप सुरजेवाला यांच्याशिवाय अनेक काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांनीच लवकरात लवकर अध्यक्षपद स्विकारावं अशी मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi's statement after the letter from the Congress leader