एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर, कमल हासन पोहोचले रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

बालासुब्रमण्यम यांना 5 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बालासुब्रमण्यम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी माहिती दिली होती. 

चेन्नई - दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मित्र आणि अभिनेता कमल हासन रुग्णालयात गेले होते. 

गेल्या 24 तासात बालासुब्रमण्यम यांची प्रकृती जास्त बिघडली असून त्यांनी जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. गेल्याच महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून बालासुब्रमण्यम यांच्यावर उपचार सुरु आहेत. 13 ऑगस्टला त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर व्हेंटिलेटर लावण्याची गरज पडली होती.

एसपी बालासुब्रण्यम यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर असून गेल्या 24 तासात ती जास्त खराब झाली आहे. सध्या एमजीएम हेल्थकेअरमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. 

बालासुब्रमण्यम यांना 5 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बालासुब्रमण्यम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी माहिती दिली होती. मात्र दोनच आठवड्यानंतर बालासुब्रमण्यम यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांना ECMO सपोर्ट आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

हे वाचा - दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनानंतर डेंग्युची लागण; प्रकृती बिघडल्याने LNJP तून मॅक्समध्ये हलवलं

एसपी बालासुब्रमण्यम यांच्या नावावर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड असून त्यांनी 40 हजार गाणी गाण्याचा विक्रम केला आहे. 1966 मध्ये त्यांनी चित्रपटात गाण्यास सुरुवात केली. पहिल्या गाण्यानंतर पुढच्या आठ दिवसातच त्यांना आणखी एक संधी मिळाली. पुढे 1981 मध्ये 8 फेब्रुवारी रोजी बालासुब्रमण्यम यांनी 12 तासांत सलग 21 गाणी रेकॉर्ड केली होती हासुद्धा एक विक्रम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP Balasubrahmanyam s condition in the last 24 hours has deteriorated