योगीजी सांगतात ठोका : अखिलेश यादव

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 डिसेंबर 2018

राज्य सरकारवर आरोप करण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी आत्मपरीक्षण करावे, कारण समाजवादी पक्ष आणि निशाद पार्टी यांचीच आघाडी आहे. या घटनेच्या चौकशीतून सर्व सत्य समोर येईलच. 

- राकेश त्रिपाठी, माध्यम समन्वयक, भाजप 

गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला मारायचे? दोघेही संभ्रमात आहेत. बदली होऊ नये म्हणून पोलिस अधिकारी एन्काउंटर करीत आहेत'', अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

गाझीपूरमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जमावाकडून पोलिस कॉन्स्टेबल सुरेश वत्स हत्या झाल्यानंतर आता राजकारणही तापले आहे. याच मुद्यावरून अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर टीका केली, तर पोलिसांनी या घटनेनंतर 19 जणांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांची पदे रिकामीच

राज्यातील बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली असून, भाजपने दोन वर्षांमध्ये पोलिस खात्यामधील सर्व रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन दिले होते; पण प्रत्यक्षात मात्र काहीच होऊ शकले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीदेखील अर्ध्यावरच लटकली असून, त्यांना पुन्हा नव्याने कर्ज घ्यावे लागत आहे. शेतकऱ्यांकडील भात आणि बटाट्याचीदेखील सरकारने खरेदी केलेली नाही, असेही अखिलेश यांनी नमूद केले. 

अखिलेश म्हणाले... 

गाझीपूरमधील घटना प्रशासनाचे अपयश 
गुप्तचर खात्याला आंदोलनाची पूर्वकल्पना होती 
निष्पाप लोकांचा चौकशीच्या नावाखाली छळ 
राज्यातील विद्यमान सरकार रा. स्व. संघाचे 
सरकारमधील लोक राज्यघटना अन्‌ संघाची शपथ घेतात 
भाजपने संकल्प यात्रेतील एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही 

अटकसत्र सुरू 

गाझीपूरमधील हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी 19 जणांना अटक केली असून, सध्या या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते.

अटक करण्यात आलेले सर्व संशयित हे राष्ट्रीय निशाद पार्टीशी संबंधित आहेत. आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, लवकरच दोषींना पकडण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक यशवीर सिंह यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP Chief AKhilesh Yadav Criticizes CM Yogi Adityanath Uttar Pradesh