esakal | ‘सीरम’मध्ये होणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन
sakal

बोलून बातमी शोधा

Sputnik V

‘सीरम’मध्ये होणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे (Serum Institute of India) रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) या कोरोनावरील लसीचे (Corona Vaccine) उत्पादन सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्ट फंड’ने (आयडीआयएफ) याबाबतची माहिती आज जाहीर केली. (Sputnik V will be Produced in Serum)

‘आयडीआयएफ’ आणि सीरम यांच्यात लशींच्या उत्पादनाबाबत करार झाला आहे. त्यानुसार दरवर्षी ३० कोटी डोस सीरम तयार करणार आहे. यातील पहिल्या हप्त्यातील लशींचे सप्टेंबरमध्ये उत्पादन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आयडीआयएफ’ने दिली.

भारताच्या औषध नियंत्रकांनी याला परवानगी दिली असून तंत्रज्ञान हस्तांतर करारानुसार आवश्‍यक असलेले नमुने ‘सीरम’ला देण्यात आले आहेत. ‘आयडीआयएफ’ने यापूर्वी स्पुटनिक व्ही’ लसीच्या उत्पादनासाठी ग्लँड फार्मा, हेटेरो बायोफार्मा, पॅनेशिया बायोटेक, स्टेलिस बायोफार्मा, व्हिरचाऊ बायोटेक आणि मॉर्पेन या कंपन्यांशी संपर्क साधला होता.

हेही वाचा: साधू-संतांमार्फत हिंदुत्वाचा अजेंडा चालवणार - मोहन भागवत

‘स्पुटनिक व्ही’ लशीची आतापर्यंत ६७ देशांत नोंदणी झाली असल्याचेही ‘आयडीआयएफ’ने सांगितले. ‘‘येत्या काही महिन्यांत स्पुटनिक व्ही लशीच्या लाखो कुप्यांचे उत्पादन करण्यात येईल. त्याची सुरुवात सप्टेंबरपासून होईल,’’ असे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी म्हटले आहे. ‘‘चांगली परिणामकारकता आणि अत्यंत सुरक्षित अशी स्पुटनिक व्ही लस देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगात उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे,’’ असेही पूनावाला यांनी म्हटले आहे.

परिणामकारकता ९७.६ टक्के

पाच डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत रशियात दिलेल्या डोसांनंतर स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता ९७.६ टक्के असल्याचे ‘आयडीआयएफ’चे म्हणणे आहे.

loading image