‘काश्‍मिरीयत’ महत्त्वाची! 

सोमवार, 17 जुलै 2017

भूलोकीचं नंदनवन - काश्‍मीर बघण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. तिथल्या हिमाच्छादित पर्वतरांगा, नद्या, फुले, फळे... असा समृद्ध निसर्ग, तेथील कला... असं सगळं भुरळ घालणारं आहे. पण तेथील अशांतता तिथे जाणाऱ्यांना अनेकदा अडवत असते. तेथील वातावरण नेमके काय आहे? तेथील नागरिकांचे म्हणणे काय आहे? ... सविस्तर विवेचन. 

‘‘गलत लोगोंको मार तो चाहिएही... मगर आम आदमीको प्यारभी चाहिए... ‘मार और प्यार’ ये दोनोंसेही मसला हल हो सकता हैं...’’ 

‘‘ये तो सारी राजनैतिक पार्टीयाँ मिली हुईं हैं... अमन से इनका कोई वास्ता नही, यें तो टेररिस्ट के साथ भी लेन-देन करते हैं और यहाँ की अशांतीको ये पॉलिटिशियनहीं जिम्मेदार हैं, आम आदमी नहीं...’’ 

संघर्षाच्या, पाकिस्तानी भोचकपणाच्या अनेक घटनांमुळे जगभर चर्चा होणाऱ्या काश्‍मिरात मी खरं तर पर्यटक म्हणून फिरत होतो, पण प्रत्येक पावलावर भेटणाऱ्या सर्वसामान्यांचं मानस असं सहजी उघड होत होतं. 

‘काश्‍मीर हे भूलोकीचं नंदनवन’ असं आपण लहानपणापासून ऐकत-वाचत असतो, पण हे नंदनवन पाहण्याचा आतापर्यंत अनेकदा हुकलेला योग गेल्या महिन्यात आला. निसर्ग पावसाळ्यात-हिवाळ्यात पर्वतरांगांना हिमवर्षावानं मढवून टाकतो, शुभ्र सफेद गालिचे अंथरतो अन त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यात तेच हिम वितळू लागतं. त्या निर्मळ जलानं भरलेल्या चिनाब, झेलम, श्‍योक, सिंध, तावी, लीडरसारख्या नद्या हिमासारख्याच शुभ्र प्रवाहानं फुफांडत पुढं झेपावतात. उन्हाळा म्हणजे चाळीस-एक्केचाळीस सेल्सियसपर्यंत चढत जाणारं तापमान, घामानं झालेली गिचगिच, धुळीचा धुरळा असा अनुभव असलेल्या पुणेकराला; ऐन मे महिन्यात न भाजणारं ऊन, पेहलगामसारख्या ठिकाणी रात्री अंगावर ओढून घ्यावं लागणारं ब्लॅंकेट, सकाळी घालावा लागणारा कोट अन आल्हाददायक वातावरण हा काही वेगळाच अनुभव होता. उंचेपुरे गोरेगोमटे देखणे तरुण आणि गाली निसर्गतःच येणारी लाली असलेल्या सुंदर तरुणींनी काश्‍मीर सजले आहे. आपल्याकडच्या चिंच-वडाच्या झाडांसारख्या विस्तीर्ण-हातात न मावणाऱ्या खोडांचे सळसळते चिनार, तसंच अक्रोड-सफरचंदाची झाडं, चेरीच्या वेलींनी ते बहरलं आहे. पण एवढं असूनही या सौंदर्याला नजर लागली. ‘रक्त आमुच्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते’ ही कुसुमाग्रजांची पंक्ती अचूक लागू ठरली. या हिमरेशमी काश्‍मीरवर रक्तपात, गोळीबार, अशांततेचा घाव बसला. खोऱ्यात अनेक ठिकाणी लष्करी ठाणी दिसू लागली. सीमेपलीकडून अतिरेकी पाठवले जाऊ लागले अन त्यांच्याकडून खोऱ्यात हिंसाचार होऊ लागला. परिपक्व राजकीय नेतृत्वाचा अभाव अनुभवाला येऊ लागला. पक्षापलीकडं जाऊन व्यापक जनहिताचा, दीर्घकालीन उपायांचा विचार न करता केवळ राजकीय स्वार्थाचाच विचार सुरू झाला. त्याचा गैरफायदा पाकिस्ताननं, त्याच्या चिथावणीनं खोऱ्यात फोफावलेल्या फुटिरतावाद्यांनी घेतला. त्यांनी अनेक गावांत फुटिरतावादी पेरले, देशाच्या विरोधातील विषारी प्रचार जाणीवपूर्वक सुरू केला. लष्करावर दगड मारण्यासाठी पैशांचं आमिष दाखवण्यात येऊ लागलं. त्यातून ‘सारी जनताच देशविरोधी आहे-स्वतंत्र काश्‍मीरची मागणी करणारी आहे’ असा भास निर्माण करण्यात येऊ लागला. राज्यात हिंसाचाराचे प्रकार दिवसा-दोन दिवसांआड होऊ लागले. विधानसभेच्या निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी असमाधानकारक असल्याचा अनुभव येत गेला. 

चित्रांतील विसंगती 
या साऱ्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरला ट्रीपला जातोय, म्हटल्यावर अनेकांनी ‘आत्ताच कशाला’ इथपासून ते ‘जपून राहा, लोकांशी फार बोलू नका, टुरिस्टला फारसा त्रास ‘ते’ देत नाहीत म्हणा...’ इथपर्यंतची मतं समोर टाकली. प्रत्यक्षात मात्र?... 

आपल्या कल्पनेपेक्षा प्रत्यक्षातील स्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचा अनुभव अनेकदा आपल्याला येतो; तोच अनुभव काश्‍मीरच्या आठ दिवसांच्या सफरीत आला. ‘लोकांशी बोलू नका’ हा सल्ला मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून मी भीतभीतच बोलायला सुरवात केली आणि आश्‍चर्यकारक अनुभव येऊ लागला. सामान्य काश्‍मिरी माणूस बोलू लागला, त्याचं मानस समोर येऊ लागलं आणि बाहेरून दिसणाऱ्या चित्रातील विसंगतीही ठळक होऊ लागल्या. 

‘काश्‍मीरमध्ये हिंसाचार’, ‘राजधानी श्रीनगरमध्ये गोळीबार’ अशा बातम्या वाचल्या किंवा रेडिओ-टीव्हीवर पाहिल्या-ऐकल्या, की संपूर्ण राज्य होरपळून निघालं असावं असं आपल्याला वाटत असतं. तसंच जमावानं लष्कराच्या दिशेनं दगडफेक केली की सगळी काश्‍मिरी जनताच भारतविरोधी झाली असल्याचा भासही अनेकांना होतो. प्रत्यक्षात हिंसाचाराची घटना जवळपास महाराष्ट्राएवढा आकार असणाऱ्या काश्‍मीर राज्याच्या एखाद्या शहरातील एखाद्या वस्तीतील एखाद्या रस्त्यावर घडलेली असते. त्याची झळ सर्व राज्याला सोडाच, पण त्या शहराच्या इतर भागांनाही लागलेली नसते. काही अतिरेक्‍यांना काही वर्षांपूर्वी ज्या दिवशी मारलं, तो दिवस फुटिरतावादी ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळतात आणि हडताळ म्हणजे बंदचं आवाहन करण्यात येतं. त्या दिवशी राज्यातल्या काही तणावग्रस्त भागांत न जाण्याचा सल्ला देण्यात येतो, पण श्रीनगरमधील व्यवहार सुरळीत सुरू असतात. मी गुलमर्गला जायच्या दिवशीच हा बंद असल्यानं गुलमर्गला न जाता श्रीनगरमध्येच फिरू, असं आमच्या कारच्या ड्रायव्हरनं सुचवलं. त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘बाहर वैसे हम जा सकते थे, मगर  खतरा क्‍यों मोल लेने का?’ 

काश्‍मीरमधील मुस्लिमांची संख्या ९७ टक्‍क्‍यांवर असली, तरी राजधानी श्रीनगरमधील शंकराचार्य टेकडीवरून रोज पहाटे लाऊड स्पीकरवरून येणारे संस्कृत श्‍लोक दाल लेकच्या परिसरात गुंजत राहतात. श्रीनगरवासियांना त्याची चांगलीच सवय झाली आहे. त्यामुळे अलीकडील काळातील काश्‍मीरबाबतच्या आपल्या कल्पनांना छेद मिळतो.

लष्कराबद्दलची मत-मतांतरं 
काश्‍मीरमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक वर्षं लष्कर ठेवलं आहे. सीमेपलीकडून पाकिस्तानी दहशतवादी येतात, हिंसाचार करतात, तरुणांना फूस लावतात. त्यांच्यावर प्रभावी उपाय करण्यासाठी लष्कराची उपस्थिती अनिवार्यच ठरते. मात्र लष्कराबाबत नागरिकांच्या मनात संमिश्र भावना दिसून येते. उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये ‘आर्मी गो बॅक’, ‘गो बॅक इंडिया’, अशा वाक्‍यांनी काही भिंती रंगविल्याचंही दिसतं. ‘लष्कराबाबत काही नागरिकांच्या मनात तिरस्काराची भावना का दिसते’ हा प्रश्‍न मी अनेकांना विचारला आणि त्याची उत्तरंही वेगवेगळी आली. 

लष्करावर दगडफेक होत असल्याचं वृत्त आपण वाचतो. का होते ती दगडफेक? ‘मॉब मे सें कोई आर्मीपे पत्थर फेकता हैं और फेकके चला भी जाता हैं। मगर आर्मी की गोली लगके जिस छोटे बच्चे की आँख चली जाती हैं, उसके घरवालोंकी रिॲक्‍शन और बर्ताव कैसा हौगा, बताओ’... शिकारा म्हणजे छताची छोटी होडी चालवणाऱ्या एकानं शिकारा चालवता-चालवता विचारलं. काहींनी मात्र ‘कोई पत्थर फेकेगा तो आर्मी क्‍या हाथ पे हाथ रखके बैठेगी क्‍या’ असा सवाल करत लष्कराच्या कारवाईचं समर्थनच केलं. हाऊस बोटीचं व्यवस्थापन करणारा फिरदोस हा तरुण काश्‍मीरमधल्या तरुणांच्या मानसाचं प्रतीकच ठरला. ‘आर्मीची संख्या खूपच अधिक आहे, जवळपास सात काश्‍मिरींमागं एक जवान असं हे प्रमाण आहे, ते कमी झालं पाहिजे’ तसंच ‘लष्कराच्या ज्या अधिकाऱ्याकडं असलेला भाग शांत त्याला ‘वरून’ फारसा निधी दिला जात नाही, अन ज्याच्या भागात तणाव, त्या अधिकाऱ्याला अधिक निधी मिळतो, म्हणून तो अधिकारी आपला भाग शांत ठेवण्याचा फारसा प्रयत्न करत नाही,’ असं त्याचं धक्कादायक विधान. ते विधान बाजारगप्पा म्हणून मी सोडून दिलं होतं, पण नंतर जेव्हा श्रीनगरमध्ये अनेक वर्षं सामाजिक काम करणाऱ्या एका पंडिताकडून पुन्हा तोच निष्कर्ष ऐकला तेव्हा तो नोंदवून ठेवावा लागला. तरीही लष्कराबाबतची नागरिकांची मतं छळत राहिली. एका तरुणाला रस्त्यावर पाडून लष्कराकडून कशी मारहाण होत होती, त्याच्या चित्रणाची क्‍लीप व्हायरल झाली होती. फिरदोसनं ती दाखवली आणि ‘लष्कर नागरिकांना कसं वागवतंय, ते पाहा,’ असं ऐकवलं. तेव्हा ‘तो तरुण खराच दोषी असेल आणि तो निरपराध असल्याचा खोटा बोभाटा पाकपुरस्कृत अतिरेकी करत नसतील, कशावरून?’ असा उलटा सवाल केल्यावर मात्र ‘तसंही असेल,’ असं म्हणत तो गप्प बसला. मात्र उगाचच लष्कराच्या विरोधातली खरी-खोटी माहिती शहरभर होते तसंच काही वेळा पेरलीही जाते. ‘लष्करावर दगड मारण्यासाठी फुटिरतावादी तरुणांना पैसे देतात,’ असंही सांगितलं जातं. 

दर सात काश्‍मिरींमागं एक जवान असं प्रमाण असल्याचा आरोप मात्र खोटा असल्याचं डॉ. अमित वांछू यांनी ठासून सांगितलं. ‘लष्करातील जवानांची ही संख्या लेह-लडाखमध्ये ठेवण्यात आलेल्या जवानांची संख्या मिळून मोजली जाते. त्यामुळं काश्‍मिरात लष्कर पुरेसं आहे आणि असलंच पाहिजे,’ असं त्यांचं मत. ज्या प्रकारे काश्‍मिरात दहशतवादी हिंसाचाराचे प्रकार करताहेत ते पाहिलं म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पुरेसं लष्कर तिथं हवंच, हे मत पटतं. डॉ. वांछू यांच्याबाबत थोडं सांगायला हवं. वांछू हे काश्‍मिरी पंडितांपैकी एक. डॉक्‍टरांचे आजोबा एच. एन. वांछू यांची अतिरेक्‍यांनी हत्या केली. तरीही डॉक्‍टर डगमगले नाहीत. कर्करोगाचे तज्ज्ञ असूनही त्यांनी डॉक्‍टरकीपेक्षा सामाजिक कामात उडी घेतली. एच. एन. वांछू ट्रस्टची स्थापना केली आणि काश्‍मिरात ते समाजबांधणीसाठी लढताहेत. सकाळ माध्यम समूहानं दिलेल्या रुग्णवाहिका त्यांचा ट्रस्ट आणि संजय नहार यांची सरहद संस्था संयुक्तपणे चालवतात. मध्यंतरीच्या हिंसाचारात संतप्त जमावानं सरकारी रुग्णवाहिका फोडल्या, पण या संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांवर एकही दगड आला नाही. 

‘आम्हाला भारतात राहायचं नाही, पाकिस्तानातही जायचं नाही, आम्हाला हवीय आझादी, आझाद काश्‍मीर,’ असं किती काश्‍मिरींना वाटतं? काश्‍मीरपासून दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्याला हा प्रश्‍न पडतो. 

‘आम्हाला शांतता हवी’ 
‘आम्हाला शांतता हवी आहे, कारण त्यावरच आमचं जीवन अवलंबून आहे,’ अशी भावना अनेक सामान्यांनी बोलून दाखवली. काश्‍मीरमध्ये फिरताना ही बाब खरी असल्याचं जाणवत होतं. कोणत्याही पर्यटन स्थळी उंचावरची ठिकाणं दाखवण्यासाठी घोड्यांची व्यवस्था असते. या घोडेवाल्यांच्या रांगाच्या रांगा तिथं लागतात. प्रत्येकाला नंबराप्रमाणं पर्यटक ग्राहक मिळतो. 

‘‘एक बार नंबर लग गया तो फिर नंबर आनेको दो-तीन दिन लग जाते हैं साब..., हमारा पेट उसपे है साब,’’ असं तोंड पाडून घोडेवाले सांगतात. गिऱ्हाईक मिळालं की दराची घासाघीस सुरू होते. सुरवातीला एका घोड्याचे दीड हजार रुपये भाडे सांगितले जाते आणि शेवटी ते तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत तुटते. उन्हाळा हाच खरा धंद्याचा हंगाम. जानेवारी-फेब्रुवारीपासून ते मे-जूनपर्यंत म्हणजे पाऊस सुरू होईपर्यंत तो चालतो. एकदा पाऊस सुरू झाला, की मग हिमवृष्टी सुरू होते. तापमान शून्याच्या खाली जातं. पेहलगामसारख्या ठिकाणच्या हॉटेलांच्या पहिल्या मजल्यापर्यंत बर्फ असतं. हिवाळी पर्यटनासाठीही काही जण येतात, पण त्यांची संख्या कमी असते. काश्‍मीरमधील बर्फ, जंगल, हिमनदी, लीडरसारख्या मोठ्या नदीचे प्रवाह हे सारं काही एकाच ठिकाणी आणि कमी अंतरात पाहायचं असेल, तर दुसरीकडं कुठंच फिरायला नको, फक्त पेहलगामला गेलं तरी चालेल, असं हे सर्वसमावेशक ठिकाण आहे. इथं घोडेवाल्यांपासून ते टॅक्‍सीवाल्यांपर्यंतच्या सेवा आहेत. 

शांततेसाठी प्रयत्न केलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल खोऱ्यात आदर व्यक्त केला जातो, पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत राग आहे. ‘‘मोदींनी श्रीनगर-जम्मू मार्गावरील भुयारी मार्गाचं उद्‌घाटन केलं तसंच त्यावेळी त्यांनी ‘तरुणांना टुरिझम हवे का टेररिझम’ असा प्रश्‍न विचारून विकासाच्या मार्गावर येण्याचं आवाहनही केलं होतं, मग त्यांच्यावर राग असल्याचं काय कारण?’’ असा सवाल तेथील स्थानिकांना केला असता त्यांनी मोदींचं एक जुनं वाक्‍यच ऐकवलं. ‘तुम्हाला पर्यटन हवं असेल तर दार्जिलिंगला जा आणि गोळ्या खायच्या असतील तर काश्‍मीरला या,’ असं त्यांनी काश्‍मीरबाबत वक्तव्य केलं होतं, ते चुकीचं होतं, असं त्यांचं म्हणणं. पण ते जुनं विधान घेऊन बसण्याऐवजी आता भुयारी मार्गासारख्या विकास योजनांना मोदी प्राधान्य देत आहेत ना, असं विचारता ‘हा भुयारी मार्ग आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू झाला होता, तो आता कुठं पूर्ण झाला आहे,’ असं उत्तर मिळालं. तसंच आता मुख्यमंत्री झालेल्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षानं सत्तेवर येताना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेतल्याचाही राग लोक बोलून दाखवतात. ‘‘बीजेपी के खिलाफ प्रचार किया, इसलिए मेहबूबा को हमनें व्होट दियें। मगर अब वो बीजेपीके साथ हो गयी, ये गलत हैं,’’ ही त्यांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया. अर्थात, काँग्रेसबद्दलही त्यांना फार प्रेम नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ अशी त्यांची भावना. दिल्लीचं सरकार कसं अनिश्‍चित, बेभरवशाचं आहे ते सांगताना ‘बंबईका फॅशन, कश्‍मीर का मौसम और दिल्ली की सरकार कब बदल जाए पता नही चलता...’ हे वाक्‍य हटकून येतं. काश्‍मीरच्या या बेभरवशाच्या ‘मौसम’चा अनुभव आम्ही घेतला. सकाळी चांगलं ऊन पडलेलं असलं तरी काही वेळातच ढग दाटून येत जोरदार पाऊस सुरू होतो आणि तो कधी थांबून पुन्हा ऊन पडतं ते समजतही नाही. दिल्लीच्या सरकारच्या मूडचीही अशीच अवस्था असल्याचं काश्‍मिरींचं म्हणणं आहे. 

प्रयत्न वाढायला हवेत 
‘आपल्याला कोणी विचारत नाही, आपलं म्हणत नाही,’ अशी काश्‍मिरींची भावना आहे. लष्कराला कारवाई करायला सांगितली, की ते त्यांच्या पद्धतीनं करतात. दहशतवादी आणि माथेफिरूंवर कारवाई करताना होणाऱ्या शोध मोहिमेत कसलाही संबंध नसलेल्या सामान्यांनाही लष्करी पद्धतीनं ‘हाताळलं’ जातं. त्यामुळं ते दुखावतात, दुरावतात. दहशतवाद्यांना तेच हवं असतं. लष्कराबद्दल, भारताबद्दल सामान्यांमध्ये जेवढा अधिक राग निर्माण होईल तेवढं त्यांचं काम सोपं होतं. तणावाची शक्‍यता असलेल्या काही रस्त्यांवर उभे असलेले जवान येणाऱ्या-जाणाऱ्या कॉलेजयुवकांकडील वस्तूंची, हॅवरसॅकची कसून तपासणी करताना दिसले. तपासणी तर हवी, दोषींना कडक शासन तर हवं, पण त्यातून निरपराध नागरिकांची देशविरोधी भावना निर्माण होता कामा नये, यासाठी काय करता येईल? त्या दृष्टीनं प्रयत्न अजिबात होत नाहीत, असं म्हणता येत नाही. ‘ऑपरेशन सद्‌भावना’सारखे प्रकल्प राबविले जातात. उदाहरणार्थ, भरकटलेल्या काश्‍मिरी तरुणांना राजधानी दिल्लीची सफर घडविली जाते आहे, ‘मेन लॅंड इंडिया’बरोबरची नाळ पुन्हा जुळवली जाते आहे, पण या संवादाची व्याप्ती वाढविली पाहिजे. दगडफेक करणाऱ्यांना केवळ गोळीनं किंवा मारहाण करून, जेलमध्ये सडत ठेवून उपाय निघणार नाही. त्यांना कोणी फूस दिली ते समजावून घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. तरुणांना पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी त्यांच्या समुपदेशनाकरिता विशेष पथकं हवीत आणि तीही लष्कराच्या साथीनंच राहायला पाहिजेत. 

‘‘केंद्र सरकारनं ईशान्य भारतासाठी सल्लागार मंडळ नेमलं, तसंच दिल्लीत काश्‍मीरसाठीही मंडळ नेमायला हवं,’’ ही सूचनाही विचार करण्यासारखी वाटते. ‘‘हे मंडळ दिल्लीत जरी बसलं तरी त्यांनी इथल्यांच्या कायम संपर्कात राहायला हवं. फक्त तणावाच्या वेळीच ते इथं आले तर त्यांच्याशी बोलण्याच्या मनःस्थितीत कोणी नसेल,’’ असं म्हटलं जातं. 

उद्योग, कलेचं भवितव्य? 
रोजगार आणि उत्पन्न यांच्यात जसजशी वाढ होत जाईल तसतसा काश्‍मीरचा प्रश्‍न सुटत जाईल. उद्योग-व्यापारात तरुण गुंतले, की त्यांना फूस लावणं फुटिरतावाद्यांना सहजासहजी शक्‍य होणार नाही. काश्‍मीरमध्ये हस्तकलेचा व्यवसाय मोठा आहे. प्रत्येक भाग एकाएका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. कुर्ता-सलवारीवर भरतकाम करणं म्हणजेच एम्ब्रॉयडरी करणं हे काम अनेक भागांत केलं जातं. बारामुल्ला जिल्हा हा अशा कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या जिल्ह्यातील याबाबतच्या सहकारी संस्थेचे मोठे शो रूम गुलमर्गच्या रस्त्यावर आहेत. त्यात प्रवेश केल्यावर आपण पर्यटक आहोत, हे ओळखून तेथील हसतमुख विक्रेता प्रथम त्या स्टोअरची ओळख करून देतो. गावागावांतील महिला कलाकारांकडून कपडे आणि वस्तू कसे तयार करण्यात आले आहेत आणि हे सहकारी केंद्र इतर व्यापारी केंद्रांपेक्षा कसं वेगळं आहे, याची माहिती तो देतो. त्यामुळं ‘नुसतं बघू तर’ असं म्हणणाऱ्या पर्यटकांचे दोन्ही हात बाहेर पडताना भरलेल्या पिशव्या सांभाळत असतात. अगदी परवडणाऱ्या चार-पाचशे रुपयांच्या कुर्त्यापासून ते तब्बल ३५ हजार रुपयांच्या तलम शालीपर्यंतचे कपडे तिथं आहेत. या शालीवरून हात फिरवला तर ‘तलमात तलम’ या शब्दाचा अर्थ कळतो. तसेच अक्रोडाच्या कवचापासून केलेल्या सजावटीच्या वस्तू हेही आकर्षण ठरतं. त्याचप्रमाणं अनंतनाग-जम्मू रस्त्यावर क्रिकेटच्या बॅटी करण्याचा उद्योगही विशेष उल्लेखनीय आणि प्रेक्षणीय आहे. बॅटीचे हे कारखाने रस्त्याच्या आतल्या भागात आणि रस्त्यालगत त्यांच्या विक्रीची दुकानं किमान काही किलोमीटरपर्यंत पसरलेली आहेत. पर्यटकांची मुलं तर चार-पाचशे रुपयांच्या एक-दोन बॅटी घेऊनच पुढं जातात. केशरसाठी काश्‍मीर विशेष प्रसिद्ध आहे. पिंजोरजवळची केशराची शेती आणि त्यानंतर त्यांच्या विक्रीची केंद्रं यांवर गर्दी लोटते. अडीचशे रुपयांना शंभर ग्रॅम या दरानं केशराच्या डब्या मिळतात. मात्र नकली केशरापासून अनेकजण सावधान करतात. कसल्या तरी मक्‍याच्या कणसांना रंगवून केशर म्हणून विकलं जातं. सफरचंदांच्या बागा लक्ष वेधून घेतात आणि त्या बागांलगत अनेक शेतकऱ्यांनी सफरचंदांचा रस विकणारी केंद्रंही उभारली आहेत. शालींबरोबरच काश्‍मिरी गालिचे परंपरेनं तयार करणारे कारागीर आहेत. हातानं केलेल्या गालिच्यांना खास समजलं जातं. असा एक गालिचा करायला एका कारागिराला एक वर्ष लागतं. या गालिच्यांची किंमत लाखांमध्ये असते. आता यंत्रानं गालिचे करण्यात येऊ लागले असून त्यांची किंमत नऊ-दहा हजारांपासून सुरू होते. बदाम-अक्रोडांची निर्यात सर्वत्र होते, पण परंपरेनं आलेल्या या उद्योगांचं, कलेचं भवितव्य काय? 

‘‘धीरेधीरे खतम हो जाएगा ये सब’’ एक जाणकार हळहळ व्यक्त करतात. उत्तम गालिच्यांपासून शालींपर्यंतच्या वस्तू करण्याची कला हातात असलेल्या कलाकारांची संख्या आता कमीकमी होते आहे. एकेकाळी काश्‍मिरात सतरा ते अठरा लाख कलाकार होते. आता त्यांची संख्या दीड लाखांवर उतरली आहे. त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले नाही, तर एके दिवशी ते संपून जाण्याची भीती आहे. सफरचंदाचा जॅम, पल्प करणारे प्रकल्प उभारले जात आहेत, त्यांना मजबूत पाया देऊन बाहेरची बाजारपेठ मिळवून दिल्यास तो उद्योग भरभराटीला येईल. इथल्या पारंपरिक कलाकारांना एकत्र करून त्यांना चांगला रोजगार मिळवून देऊ शकतो. तसंच देशभरातून पर्यटक काश्‍मीरमध्ये बोलावले पाहिजेत. सगळ्या भारतवासीयांनी येत्या पाच वर्षांत किमान एकदा काश्‍मीरला भेट दिली तर काश्‍मीरची अर्थव्यवस्था दौडू लागेल. जम्मू तसेच श्रीनगरपर्यंतच्या विमानाचं भाडं खास बाब म्हणून सरकारनं कमी केलं, तर पर्यटक इकडं वळतील. तरुणांना या सर्व क्षेत्रांतील कौशल्य शिकवायची गरज आहे. ‘शालेय विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं पाहिजे,’ असं मत मांडलं जातं. 

काश्‍मिरींचा अनुभव 
राजकारणी आणि त्याचा राजकीय पक्ष मग तो कोणताही असो, त्यानं राजकारण केलं, कृती केली ती स्वतःच्या किंवा पक्षाच्या फायद्यासाठीच. देशहिताचा बळी गेला तरी चालेल, तणाव वाढला तरी चालेल, पण माझा स्वार्थ बुडता कामा नये, अशीच भूमिका घेतल्यानं काश्‍मीरचा प्रश्‍न बिकट झालाय. हुर्रियतला सरळ ठेवलं तर सगळं काही सुरळीत होऊ शकतं, पण त्यांचंच लांगूलचालन केलं जातंय, असा काश्‍मिरींचा अनुभव आहे. 

यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक पावलं आवश्‍यक आहेत, नागरिकांना विश्‍वासात घेणं गरजेचं आहे आणि माणसं जोडणाऱ्या घटना सगळ्यांपर्यंत पोचवल्या गेल्या पाहिजेत. ‘दुर्दैवानं मीडिया केवळ नकारात्मक घटनांचंच रिपोर्टिंग करतं,’ अशी विचारवंतांची खंत आहे. 

... या सगळ्या समस्यांच्या जंजाळातून मग पुढं आलं एक उत्साह देणारं वाक्‍य. ‘‘काळजी करू नका, पुढची तीनशे वर्षं काश्‍मीर भारतातच राहील... पाकिस्तानचा पर्याय त्यांना मान्यच नाही आणि स्वतंत्र काश्‍मीर परवडणारं नाही...’’ त्यामुळं आता फक्त ‘राजकारण गेलं चुलीत’ असं म्हणत काश्‍मिरीयतीला प्रेमानं जवळ करायची, विश्‍वास देण्याची, गैरवाटेला न लागता उद्योग-धंदा-रोजगाराला लावण्यासाठीचं वातावरण करण्याची गरज आहे... तसं झालं तर कितीही वेळा कारगिल झालं तरी भारत ताठ, अभंग राहील, पृथ्वीवरच्या नंदनवनासह...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: srinagar kashmir sunil mali article

फोटो गॅलरी