श्रीशैलम - आगीत अडकलेल्या 9 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

जलविद्युत केंद्रात आग लागली तेव्हा १९ जण काम करत होते. त्यापैकी १० जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर नऊ जण अडकले होते.

हैदराबाद - तेलंगण , आंध्र प्रदेश सीमेवर असलेल्या श्रीशैलम जलविद्युत केंद्रातील भूमिगत युनिटमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत नऊ जण अडकले होते. या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर येत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ६ जणांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी दोन मृतदेह सहायक अभियंत्याचे आहेत. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या दुर्घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी मदतकार्यात सर्वतोपरी सहकार्य करू असे म्हटले आहे. 

काल रात्री जलविद्युत केंद्रात आग लागली तेव्हा १९ जण काम करत होते. त्यापैकी १० जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर नऊ जण अडकले होते. त्यात एक विभागीय अभियंता, चार सहायक अभियंते, दोन ज्युनिअर प्रकल्प सहायक, अमार राजा बॅटरीचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. पैकी सहा जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

बचाव पथकाचे प्रमुख श्रीदास म्हणाले की, घटनेच्या वेळी हे कर्मचारी भूमिगत मजल्यावर होते. त्याखाली आणखी तीन मजले आहेत. खालच्या मजल्यावर टर्बाइन असून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जनरेटर, वीजेचे पॅनल आहेत. चौथ्या मजल्यावर म्हणजेच तळमजल्यावर सर्व्हिस बे आहे. प्रचंड धुरामुळे आणि आग पसरल्यामुळे हे अभियंते वेगवेगळ्या मजल्यावर अडकले. कितीवेळ मदतकार्य सुरू राहिल, हे आताच सांगणे कठिण असल्याचे ते म्हणाले.

जखमीत उप अभियंता आणि सहायक अभियंत्याचा समावेश आहे. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. तेलंगणचे उर्जामंत्री जी जगदिश्‍वर रेड्डी, कार्यकारी संचालक डी. प्रभाकर राव हे घटनेची माहिती कळताच तात्काळ तेथे पोचले. यादरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मदतकार्यावर लक्ष ठेऊन असून त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. 

हे वाचा - राज्यसभेच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक

श्रीशैलम धरणालगत असलेल्या जलविद्युत केंद्रात शॉर्टसर्किटने आग लागली. जलविद्युत प्रकल्पात चार युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मदत कार्य सुरू असताना घटनास्थळी मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडथळे आल्याचे तेलंगण राज्य उर्जा निर्मिती महामंडळाचे मुख्य अभियंता बी. सुरेश यांनी सांगितले.

शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज 
जलविद्युत प्रकल्पातील पॅनल बोर्डमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रकल्पाच्या परिसरात प्रचंड धूर पसरला होता. हा प्रकल्प कृष्णा नदीवर असून हे धरण आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे विभाजन करते. कामावरील अधिकाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु वीज गेल्याने त्यांना फारसे यश आले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srisailam fire accident Nine persons lost their lives