esakal | स्टॅलिन नावामागे रंजक किस्सा! जाणून घ्या तमिळनाडूच्या नव्या मुख्‍यमंत्र्यांबाबत
sakal

बोलून बातमी शोधा

Stalin

तमिळनाडूचे २३ वे मुख्‍यमंत्रिपदाची (Chief Minister of Tamil Nadu) सूत्रे मुथुवल करुणानिधी स्टॅलिन (Stalin) ऊर्फ एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी स्वीकारली.

म्हणून करुणानिधींनी त्यांच्या मुलाचं नाव स्टॅलिन ठेवलं!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चेन्नई- तमिळनाडूचे २३ वे मुख्‍यमंत्रिपदाची (Chief Minister of Tamil Nadu) सूत्रे मुथुवल करुणानिधी स्टॅलिन (Stalin) ऊर्फ एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी स्वीकारली. वडील व द्रमुकचे प्रमुख नेते करुणानिधी (karunanidhi) यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे आपोआप आला. स्टॅलिन यांनी चित्रसृष्टीतही मुशाफिरी केली आहे. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमधील कलाकार ते द्रमुकच्या युवा शाखेचे नेते, असा प्रवास करीत ते राजकारणात उतरले. (Stalin 23rd Chief Minister of Tamil Nadu know about him)

एम. करुणानिधी आणि दयाळू अम्मा यांचे स्टॅलिन ते तिसरे पुत्र. १ मार्च १९५३ रोजी त्यांचा जन्म झाला. तत्कालीन सोव्हिएत संघराज्याचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरून त्यांचे नाव स्टॅलिन ठेवण्यात आले. जोसेफ स्टॅलिन यांच्या निधनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करुणानिधी यांना मुलगा झाल्याचं कळलं होतं. त्यामुळे त्यांनी मुलाचं नाव स्टॅलिन ठेवलं. चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा राजकारणात सहज प्रवेश झाला. करुणानिधी हे तमिळनाडूतील रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव होते. त्यांच्याप्रमाणे स्टॅलिन यांनी सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये काम केले. द्राविडी चळवळीचा आदर्श आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या नाटकांमधून त्यांनी प्रामुख्याने काम केले आहे.

हेही वाचा: Breaking : स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

द्रमुक प्रथम १९६७मध्ये सत्तेवर आले, त्यावेळी शालेय विद्यार्थी असलेले स्टॅलिन (वय १४) यांनी मित्रांसह द्रमुकची युवा शाखा स्थापन केली. शालेय जीवनापासूनच स्टॅलिन सामाजिक कार्यात अग्रेसर होते. द्रविडी चळवळीतील नेत्यांचा वाढदिवसही ते साजरा करीत असत. चेन्नई महापालिका निवडणुकीत १९६८ मध्‍ये त्यांनी पक्षाचा प्रचार केला होता. त्यावेळी द्रमुकला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर स्टॅलिन यांचा खरा अर्थाने पक्षात उदय झाला. युवा शाखेचे चिटणीस, चेन्नईचे महापौर, द्रमुकचे आमदार अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. चेन्नईतील थाउजंड लाईट्स विधानसभा मतदारसंघातून ते १९९६, २००१ आणि २००६ असे तीन वेळा निवडून आले आहेत. २००६ मध्ये द्रमुक सत्तेवर असताना त्यांना प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. २००९ मध्ये ते तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री होते. करुणानिधी यांच्या निधनानंतर स्टॅलिन यांची पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. २०१९ मधील लोकसभेची निवडणूक स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लढविली आणि त्यात चांगले यशही मिळाले होते.