Stray animals Report |रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या देशातील 24 राज्यांच्या लोकसंख्येहून जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panic of stray dogs on the streets of Sangli

रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या 24 राज्यांच्या लोकसंख्येहून जास्त

तुम्हाला घराबाहेर पडल्यानंतर रस्त्यावर किंवा छत नसलेल्या ठिकाणी अनेकदा कुत्रे-मांजरी दिसल्या असतील. काही जणांना मुक्या प्राण्यांबद्दल जिव्हाळा असतो. तर काहींना भटक्या प्राण्याचा तिटकारा असतो. पण देशभरातील भटक्या कुत्र्या-मांजरांवर अहवाल समोर आला आहे. मार्स पेटकेअर इंडियाने प्राणी कल्याण तज्ञांच्या सल्लागार मंडळासोबत भागीदारीत 'स्टेट ऑफ पेट होमलेसनेस इंडेक्स' अहवाल जारी केला आहे. त्यानुसार धक्कादायक खुलासा झालाय.

देशातील अंदाजे 79.9 दशलक्ष बेघर मांजरी आणि कुत्रे रस्त्यावर राहतात. अमेरिका, चीन आणि जर्मनी सारख्या देशांच्या तुलनेत भारतामध्ये ही संख्या सर्वाधिक आहे, असे मार्स पेटकेअर इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे. भारतात अंदाजे 80 दशलक्ष बेघर मांजरी आणि कुत्री आश्रयस्थानात किंवा रस्त्यावर वास्तव्यास आहेत. महत्वाचं म्हणजे भारतात 24 राज्य अशी आहेत, ज्यांची प्रत्येकी लोकसंख्या 80 दशलक्षपेक्षा कमी आहे. याशिवाय 8 केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार ही आकडेवारी आहे.

पाळीव प्राण्यांच्या बेघरपणावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांवर आधारित हे सर्वेक्षण पार पडलं. यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार केल्यानंतर भारताला 10 पैकी 2.4 रेटिंग देण्यात आलं. यावरून आपल्या देशात भटक्या प्राण्यांविषयीच्या परिस्थितीची माहिती कळते. भारताला एवढं कमी रेटिंग का दिलं, याची मुख्य कारणं म्हणजे तुलनेने कमी प्राण्यांची नसबंदी आणि लसीकरण, रेबीजसह कुत्र्यांच्या रोगांचे जास्त प्रमाण, पाळीव प्राणी पाळण्याची जास्त किंमत आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी मजबूत कायद्यांचा अभाव.

COVID-19 महामारी दरम्यान पाळीव प्राण्यांच्या मालकीमध्ये वाढ झाली. अनेकांनी काहींना दत्तक घेतलं. भारतातील आकडेवारी दर्शवते की लॉकडाऊन दरम्यान पाळीव प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींपैकी दोन तृतीयांश पालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांबद्दल नव्याने उत्सुकता वाटली. आणि 10 पैकी सहा लोकांना लॉकडाऊनच्या परिस्थितीत प्राणी दत्तक घेण्यास प्रोत्साहन मिळालं.

भारतात केलेल्या सर्व्हेक्षणाने घरांतील मर्यादा, आर्थिक मर्यादा, व्यावहारीक अडथळे आणि भटक्या, पाळीव प्राण्यांच्या वर्तणुकीसंबंधी जागरुकता नसणे यासारख्या अनेक आव्हानांवर प्रकाश टाकला. यामध्ये आश्रयस्थानांमधून प्राणी दत्तक घेण्याऐवजी उच्च जातीचे कुत्रे आणि मांजरी घेण्यास लोक प्राधान्य देत असल्याचं जाणवतं.

loading image
go to top