'मंदिर नाही तर मत नाही!' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

विश्‍व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेत लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी, "आम्ही भीक मागत नसून, मंदिराची मागणी करीत आहोत. राममंदिर उभारणीचा संकल्प केलेले सरकार सत्तेत आहे तेव्हा त्यांनी लोकांच्या भावनांचा आदर करावा,'' असे सांगितले.

नवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) "मंदिर नाही, तर मत नाही,' असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. विश्‍व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेत लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी, "आम्ही भीक मागत नसून, मंदिराची मागणी करीत आहोत. राममंदिर उभारणीचा संकल्प केलेले सरकार सत्तेत आहे तेव्हा त्यांनी लोकांच्या भावनांचा आदर करावा,'' असे सांगितले. न्यायपालिकेची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असे सांगताना जोशी यांनी, न्यायालयानेही जनभावनेचा सन्मान करावा, असाही गर्भित इशारा दिला. 

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर संघपरिवाराने अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील राममंदिराचा मुद्दा पुन्हा तापविला असून, आजची धर्मसभा त्याचाच भाग होती. आगामी हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणून वा कायदा करून राममंदिराचा मुद्दा मार्गी लावावा, असा दबाव संघाने मोदी सरकारवर बनविण्यास सुरवात केली आहे. या मेळाव्यावर साधूंच्या एका आखाड्याचा बहिष्कार व व्हीआयपी कक्षातील अनेक रिकाम्या खुर्च्या, हे वास्तव चित्र असले, तरी या मेळाव्याला प्रचंड गर्दी जमली होती. केंद्र व उत्तर प्रदेशात दोन्हीकडे भाजपचे सरकार असूनही मंदिर निर्माण का होत नाही ? असा संतप्त सवाल अनेक वक्‍त्यांनी विचारला. 

जोशी म्हणाले, ""इतकी वर्षे न्यायालयाचा सन्मान करूनच हिंदू समाजाने प्रतीक्षा केली, पण आता सहनशीलतेचा अंत पाहू नये. न्यायालयानेही या देशातील जनभावना समजून घ्यावी. राममंदिर उभारणीची मागणी म्हणजे आम्ही भीक मागत नाही. तो या देशाच्या अस्मितेचा सवाल आहे. आम्ही राममंदिरही भव्य बनवू व भारतही भव्य बनवू. जो संकल्प करून सत्तेवर आले, तो मंदिर उभारणीचा संकल्प पूर्ण करावा. 1992 मध्ये फक्त बाबरी मशीद पडली व काम अर्धवट राहिले. भव्य मंदिराची निर्मिती अजून बाकी आहे.'' 

स्वामी परमानंद म्हणाले, ""आम्ही कळसूत्री बाहुल्या नाही व तुम्हाला (मोदी सरकार) घाबरतही नाही. नरेंद्र मोदी सरकारने लवकरात लवकर मंदिर उभारले नाही, तर पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही.'' 

यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी सार्वजनिक व्यासपीठावर दिसलेल्या साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू समाजातील जातिभेदांवर टीकास्त्र सोडले. योगींनी लाखो दिव्यांनी अयोध्या सजवली, पण जोवर रामलल्ला स्वतःच्या भव्य मंदिरात जात नाहीत, तोवर शांतता मिळणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली. 

दीड लाखांची गर्दी 
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मैदानात व साऱ्या परिसरात मिळून दीड ते दोन लाखांची गर्दी होती. कडाक्‍याच्या थंडीतही अगदी सकाळपासूनच जय श्रीरामची घोषणा देत लाखोंचे जथ्थे रामलीला मैदानाकडे येण्यास सुरवात झाली. किमान 50 बस सभास्थानी दाखल झाल्या. भगव्या टोप्या घालून आलेले लोक जय श्रीराम व "मंदिर नही तो वोट भी नही,' च्या घोषणा देत होते. वेदमंत्रांच्या घोषात धर्मसभेला प्रारंभ झाला. दुपारी 12 नंतर मैदानात शिरण्यासाठी धक्काबुक्की सुरू झाली व पत्रकारांसाठी राखीव असलेल्या क्र. 2 च्या प्रवेशद्वारातून रेटारेटी करतच जमाव आत शिरला. मैदानात ठिकठिकाणी ठेवलेल्या मोठमोठ्या कलशांमध्ये विहिंपने घरोघरी वाटलेल्या मंगलाक्षता व संकल्प पत्रांचा खच साठला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement of RSS s Bhaiyyaji Joshi on Issue of Ram temple