
जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तिकीटातून जमा झालेले पैसे संबंधित खात्यात वेळेत जमा न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला.
अहमदाबाद- जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तिकीटातून जमा झालेले पैसे संबंधित खात्यात वेळेत जमा न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ही रक्कम सुमारे ५.२४ कोटी असून याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बुधवारी खात्यावर जमा झाल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नाही.
ऑक्टोबर २०१८ रोजी नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला आहे. देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांसाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. गेल्या वर्षाभरात या ठिकाणी हजारो नागरिकांनी भेट दिली. याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीटातून दीड वर्षात ५,२४,७७,३७५ रुपयाचा निधी गोळा झाला. हा निधी स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या खात्यावर जमा करण्याचे कंत्राट बडोदा येथील एका खासगी बँकेला दिले होते.
कृषी कायदे रद्द करा, अन्यथा संपूर्ण दिल्ली ब्लॉक करु; शेतकरी आक्रमक
पोलिस उपअधीक्षक वाणी दूधत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे गोळा करणाऱ्या कंपनीने आणि काही कर्मचाऱ्यांनी हे पैसे खात्यात वेळेत जमा केले नाही. मात्र आज स्टॅच्यू ऑफ यूनिटी प्राधिकरणाने आज आपल्या खात्यात ५.२४ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले. यासंदर्भात व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा या प्रकरणात सहभाग नाही. ही बाब बँक आणि रोकड जमा करणाऱ्या कंपनीदरम्यानची आहे. मात्र आता बँकेने आमचे पैसे जमा केले आहेत.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या एफआयआरनुसार, २००३ पासून संबंधित कंपनी बँकेसाठी रोकड जमा करण्याचे काम करते. यानुसार याच कंपनीला स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तिकीटातून जमा झालेले पैसे गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या दोन खात्यावर पैसे जमा करणे गरजेचे होते. मात्र अलीकडच्या ऑडिटमध्ये स्टॅच्यू ऑफ यूनिटीला मिळालेली रक्कम आणि जमा झालेली रक्कम यात मेळ बसत नव्हता. चौकशीअंती ५.२४ कोटी रुपये जमा झालेले नसल्याचे आढळून आले (मार्च २०२० पर्यंत). त्यामुळे खासगी बँकेच्या व्यवस्थापकांनी सोमवारी केवडिया पोलिस ठाण्यात रोकड जमा करणारी संस्था आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली.