esakal | Coronavirus : संसर्गाला रोखणार ‘जनता कर्फ्यू; अत्यावश्‍यक सेवा फक्त सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi

देशभरात

 • अयोध्येत रामनवमीला भाविकांना प्रवेशबंदी
 • श्रीनगरमध्ये मशिदीत प्रार्थना थांबविल्या
 • लालूप्रसाद यादव एकांतवासात
 • वाराणसीत ३९ नगरसेवक एकांतवासात
 • कनिका कपूरविरोधात खटला दाखल
 • प. बंगालमध्ये बारावीची परीक्षा रद्द
 • गुजरातमध्ये न्यायालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या घटविली
 • कोरोनाचा फटका बसलेल्या कर्जदारांसाठी एसबीआयचे कर्ज
 • कर्नाटकात तिघांना बाधा
 • सुरतेत हिरे कंपन्यांना टाळे
 • गोव्यात परराज्यांतील वाहनांना प्रवेश नाही
 • रोममधील भारतीयांना आणण्यासाठी विमान रवाना
 • यूपीत ८३ लाख कामगारांना घरून काम करण्याचे आदेश
 • तमिळनाडूतील कासारगोड लॉकडाऊन
 • यूपीतील मंत्र्यांसह २८ जण निगेटिव्ह
 • प. बंगालमध्ये बटाटे २० टक्क्यांनी महागले
 • मध्य प्रदेशातील दोन ज्योतिर्लिंग बंद
 • गुजरातेत आणखी सहा बाधित, रुग्णांची संख्या तेरा
 • पुरुषाच्या हातावरील शिक्का पाहून राजधानी एक्स्प्रेसमधून दांपत्यास उतरविले

Coronavirus : संसर्गाला रोखणार ‘जनता कर्फ्यू; अत्यावश्‍यक सेवा फक्त सुरु

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून, आजचा (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’ हा या संसर्गाला रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय ठरू शकतो. मुंबई, दिल्लीतील मेट्रोची चाके थांबणार असून, रेल्वेनेही अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक भागांतील बससेवा अंशतः बंद केली जाणार असून, आपत्कालीन सेवा मात्र पूर्ववत सुरू राहतील. देशातील जनतेने ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकी दाखवून देत घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, ‘अनावश्‍यक प्रवास टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला ऐका,’ असे आवाहन केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, रोममध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना लवकरच मायदेशी आणण्यात येईल आणि येथे आणल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली वेगळे ठेवले जाणार आहे. भविष्यात देशातील नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरची आवश्‍यकता वाढणार आहे ही बाब लक्षात घेऊन सरकारने या दोन्ही घटकांच्या उत्पादनाला वेग दिला आहे.

लोकांमध्ये या विषाणूच्या संसर्गाबाबत बरेचसे गैरसमज आहेत. प्रत्येकाला मास्क घालून फिरण्याची आवश्‍यकता नाही. संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये उद्या मॉक ड्रीलदेखील घेतले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आणीबाणीच्या स्थितीमध्ये कशा पद्धतीने स्थिती हाताळायची याचे प्रशिक्षणही अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिले जात आहे. संसर्ग झालेल्या पण लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संपर्क झाल्यापासून पाच ते चौदा दिवसांमध्ये चाचणी घ्यावी असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

दूतावास नागरिकांच्या मदतीस धावले
जगातील विविध देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांशी देशभरातील दूतावासांनी संपर्क साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक दूतावासांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनदेखील सुरू केल्या आहेत. कॅनडा, ग्रीस, फिनलँड, इस्टोनिया, इस्राईल, जपान, व्हिएतनाम, बल्गेरिया, उत्तर मॅसिडोनिया, रशिया, क्युबा, ब्राझील आणि स्वित्झर्लंड आदी देशांतील दूतावासांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रेल्वेमध्ये गर्दी करू नका
तेरा मार्च रोजी दिल्ली ते रामागुंडम दरम्यान संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या आठही प्रवाशांना संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. प्रवासातून मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरू शकतो, ही बाब लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. दरम्यान, रेल्वेने काउंटरवरून घेतल्या जाणार तिकिटांसाठीच्या परताव्याचे नियम शिथिल केले असून, २१ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान हे नियम लागू असतील. तिकीट रद्द झाल्यानंतर प्रवाशांना शंभर टक्के परतावा मिळू शकेल.

माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, सध्या आपण ज्या शहरामध्ये आहात, कृपया काही दिवस तिथेच थांबा. या माध्यमातून आपण संसर्ग रोखू शकतो. रेल्वे आणि बस स्थानकांवर गर्दी करून आपण स्वत:च्या आरोग्याशी खेळत आहोत. कृपया स्वत:ची आणि कुटुंबीयांची चिंता करा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हे सुरू राहणार
वर्तमानपत्रे, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, बँकिंग सेवा आणि रिझर्व्ह बँक, दूरध्वनी आणि इंटरनेट, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक, भाजीपाला आणि किराणा माल दुकाने, रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वीज, इंधन,पेट्रोल पंप, प्रसारमाध्यमे, अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या आयटी कंपन्या, बंदरे.

मास्क, सॅनिटायझरच्या किमती निश्‍चित
देशातील मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या किमती निश्‍चित केल्या आहेत. मास्कसाठी आता आठ ते दहा रुपये आणि सॅनिटायझरच्या दोनशे मिलीलिटर बाटलीसाठी शंभर रुपये मोजावे लागतील, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

सर्वच संशयितांची तपासणी होणार
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चाचणीच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या नियमान्वये श्‍वसनाचा गंभीर आजार, ताप आणि खोकला असणाऱ्या सर्वच संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.