स्टरलाइट प्रकल्प बंदच राहणार;  मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

sterlite-copper-sterlite-copper
sterlite-copper-sterlite-copper

चेन्नई - वेदांता लिमिटेड कंपनीला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. कंपनीचा तमिळनाडूतील तुतीकोरिन येथील स्टरलाइट तांब्याचा प्रकल्प बंद ठेवण्याचा पूर्वीचा आदेश न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवला. हा निर्णय म्हणजे तमिळनाडू सरकार आणि तेथील जनतेचा मोठा विजय मानला जात आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची कंपनीची फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली. 

पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन केल्याने तमिळनाडू सरकारने तुतीकोरीन येथील स्टरलाइट प्रकल्प २०१८ मध्ये बंद केला होता. या प्रकल्पामुळे पाणी व हवेचे प्रदूषण होत असल्याने तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने (टीएनपीसीबी) तो बंद करण्याचा आदेश २४ मे २०१८ मध्ये दिला होता. मात्र त्याच्या दोन दिवस आधी या कंपनीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

न्या. टी. एस. शिवांगनम आणि न्या. व्ही. भवानी सुब्बरॉय यांच्या खंडपीठाने प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात परवानगी देता येणार नाही, असे सांगून ‘वेदांता’ची फेरविचार याचिका फेटाळली. हा आदेश मार्च महिन्यातच देण्यात येणार होता, पण कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे आता सुनावण्यात आला, असे न्‍या. शिवांगनम यांनी सांगितले. हाच आदेश यापुढेही लागू राहील, असे ते म्हणाले. कारखाना परिसरात वीज आणि पाण्याचे कनेक्शन देण्याची वेदांता लिमिटेडची मागणीही न्यायालयाने फेटाळली. तुतीकोरीनच्या नागरिकांनी फटाके फोडून या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. 

तुतीकोरीनच्या जनतेचा विजय 
दरम्या, स्टरलाइट प्रकल्पावरील मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे तमिळनाडूतील राजकीय नेत्यांनी स्वागत केले आहे. एमडीएमकेचे नेते वैको यांची कार्यकर्ता व वकील अशा दोन्ही पातळींवर प्रकल्‍पाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका होती. ‘‘ हा तुतीकोरीनच्‍या नागरिकांचा विजय आहे. राजकारणाच्यादृष्टीने हा विजय ‘द्रमुक’चा आहे,’’ असे वैको म्हणाले. 

पर्यावरणाच्या जीवावर आपण जो विकास करीत आहोत, तो किती धोकादायक आहे, हे या निर्णयातून आम्हाला समजले आहे. स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या नागरिकांचा हा विजय आहे. 
कनिमोळी, तुतीकोरीनच्या खासदार 

जर सरकारने लोकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले असते तर १३ जीव वाचले असते. न्यायालयाचा हा निर्णय आंदोलनातील  मृतांना सर्मपित आहे. 
के. बालकृष्णन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते 

अण्णा द्रमुक आणि द्रमुक पक्षाने स्टरलाइटला मदत केली आणि भाजपने कायम उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले. या प्रकल्पाला आमचा कायमच विरोध होता. 
श्रीनिवासन, भाजप नेते 

स्टरलाइटविरोधातील या निर्णयाने आयुष्याचा त्याग केलेल्या आंदोलकांना न्याय मिळाला आहे. जनतेचा आवाज विजयी होतो याचे हे आणखी एक उदाहरण आहे. 
कमल हसन, अभिनेता व मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष 

आंदोलनाची पार्श्‍वभूमी 
न्यायालयाचा हा आदेश राज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील तुतीकोरीन येथे वेदांता कंपनीच्या स्टरलाइट तांबे प्रकल्पाची स्थापना १९९० मध्ये झाली. तेव्हापासून या प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याची टीका करण्यात येत होती. पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये या प्रकल्पाला १०० कोटी रुपये दंड ठोठावला होता. २०१८ मध्ये परिसरात नागरिकांनी पर्यावरण व सामाजिक कार्यकर्त्यांसह आंदोलन केले होते.२२ मे रोजी या आंदोलनाच्या शंभरावा दिवशी रहिवासी व कार्यकर्त्यांनी प्रतिबंधात्मक आदेश झुगारून प्रकल्पाच्या विस्ताराविरोधात निषेध नोंदविला. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात १२ जण ठार झाले. त्यात १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचाही समावेश होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या या कृत्याचा निषेध करणाऱ्या युवकावरही पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्याच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागल्याने राज्य सरकारने हा तांबे प्रकल्‍प बंद करण्याचा आदेश दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com