esakal | देशात 150 जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder
देशात 150 जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतींसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्यांहून अधिक आहे, अशा दीडशे जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठकीत बाधित जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन प्रस्तावित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याची सूचना केली आहे. परंतु कोरोना मृतांचे प्रमाण मोठे असल्याने आवश्‍यक सेवांना सूट देऊन लॉकडाउनचा विचार केला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी, भ्रमातून बाहेर पडा, कोरोनाविरोधी लढ्याला बळकटी द्या, असे ट्विट केले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, तमिळनाडूसह आठ राज्यांतील कोरोनाचे रुग्ण हे एकूण रुग्णसंख्येच्या ६९ टक्के आहेत. कोरोना संक्रमणाचा दर पंधरा टक्क्यांहून असलेल्या विविध राज्यांतील दीडशे जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे.मात्र, महाराष्ट्रात आधीच लॉकडाउन आहे. यांसह कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत असल्याने संक्रमणाचा दर कमी होऊ लागला आहे. म्हणून महाराष्ट्राचे मॉडेल अन्य राज्यांत वापरले जाऊ शकेल.

आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत हा विचार झाला तरी हर्षवर्धन यांचे ट्विट पाहता आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कधीही सूचना जारी केल्या जाऊ शकतात.

हेही वाचा: कोरोनाचा भारतीय व्हेरियंट अनेक देशांत पसरतोय; WHO चा दावा

आकडे वाढता वाढे

देशभरात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी ७३.५९ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे ६६ हजार ३५८ नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. नंतर उत्तर प्रदेश ३२ हजार ९२१ आणि केरळमध्ये ३२,८१९ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसून येत आहे.

अफवांवर विश्‍वास नको!

थंड पाण्यात लिंबू पिळून तसेच बेकिंग सोडा टाकून प्यायल्यास कोरोनाचा विषाणू शरीरातून नष्ट होतो, अशा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, त्यावरही डॉ. हर्षवर्धन यांनी खुलासा केला आहे. या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, अफवांवर विश्‍वास ठेऊ नका, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.