esakal | 'अमेझिंग! अख्ख्या मंत्रिमंडळालाच...',व्याजदराच्या युटर्नवरून सुब्रमण्यम स्वामींचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Swamy

व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने निघाला असल्याचं म्हणत निर्णय मागे घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

'अमेझिंग! अख्ख्या मंत्रिमंडळालाच...',व्याजदराच्या युटर्नवरून सुब्रमण्यम स्वामींचा टोला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काल 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2020-2021 च्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीलाच मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला होता. मोदी सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. मात्र, आता मोदी सरकारने हा निर्णय मागे घेत 2020-21 मधील व्याजदर 'जैसे थे' राहणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. हा निर्णय नजरचुकीने निघाला असल्याचं म्हणत निर्णय मागे घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. त्यांच्या या निर्णयावर सध्या चहुबाजूने टीकेची झोड उठत आहे. काल व्याजदर कपातीचा निर्णय देखील जोरदार टीकेस पात्र ठरला होता. मात्र, आता काही तासांतच हा निर्णय फिरवताना कालची चूक नजरचुकीने झाली असल्याचं स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. खुद्द भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीच यावरुन जोरदार टोला हाणला आहे. 

अमेझिंग! अर्थमंत्र्यांना नजरचुकीची समस्या आहे? की संपूर्ण अर्तमंत्रालयाला नजरचुकीची समस्या आहे? असं म्हणत त्यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. काल मोदी सरकारने अल्पबचत व्याजदरांमध्ये केलेली कपात धक्कादायक मानली जात होती. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर हा निर्णय दुरगामी परिणाम साधणारा मानला जात होता. हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र आता अवघ्या 24 तासांत मोदी सरकारने आता हा निर्णय फिरवला आहे.

हेही वाचा - मोदी सरकारची माघार; नजरचुकीने अल्पबचत व्याजदर कपातीचा निर्णय

अशी झाली होती कपात

बचत खात्यामधील जमा रकमेवर वार्षिक व्याज 4 टक्क्यांवरुन कमी करुन 3.5 टक्के करण्यात आला होता. पब्लिक प्रॉव्हींडट फंड (PPF) वर आतापर्यंत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत होते, ते कमी करुन आता 6.4 टक्के करण्यात आले होते. एका वर्षाच्या जमा रकमेवरील तिमाही व्याजदर 5.5 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आणला गेला होता. वयस्कर लोकांच्या बचत योजनांवर आता 7.4 टक्क्यांऐवजी केवळ 6.5 टक्के इतकेच तिमाही व्याज मिळणार होते.  एका वर्षासाठीच्या टर्म डिपॉझिटवर 5.5 टक्क्यांऐवजी 4.4 टक्के व्याज तर 2 वर्षांसाठीच्या बचतीवर 5.5 टक्क्यांऐवजी 5 टक्के, 3 वर्षांसाठीच्या बचतीवर 5.5 टक्क्यांऐवजी 5.1 टक्के, 5 वर्षांसाठीच्या बचतीवर 6.7 टक्क्यांवरुन 5.8 टक्के व्याजदर मिळणार होते. तर 5 वर्षांच्या आरडीवर 5.8 टक्क्यांवरुन 5.3 टक्के व्याजदर मिळणार होता. मासिक पगार खात्यावर आता 6.6 टक्क्यांऐवजी फक्त 5.7 टक्केच व्याजदर मिळणार होता. नॅशनल सेव्हींग्स सर्टिफिकेटवर 6.8 टक्क्यांऐवजी केवळ 5.9 टक्के व्याजदर दिला जाणार होता. किसान विकास पत्रावर 6.9 टक्क्यांऐवजी 6.4 टक्के व्याज तर मॅच्यूअर होण्याचा अवधी 124 महिन्यांवरुन वाढवून 138 महिने केला होता. याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदराला 7.6 टक्क्यांवरुन 6.9 टक्क्यांवर आणण्यात आलं होतं. 
 

loading image