Success Story Of Pravina : अडथळ्यांवर मात करत ‘ती’ १९ व्या वर्षी सरपंच

व्यसनी पित्याचा मृत्यू, दारिद्रय, शाळाही सोडावी लागली
Success Story Of Pravina
Success Story Of Pravinasakal

पाली (राजस्थान) : बालपणीच गमावलेले व्यसनी पित्याचे छत्र, भीषण दारिद्र्यामुळे शाळा अर्धवट सोडून इतरांची गुरे शेतावर चरण्यासाठी नेण्याची आलेली वेळ, पुरुषसत्ताक व्यवस्थेने अल्पवयीन असतानाच लग्न लावून देण्याचा केलेला प्रयत्न आदी एकामागून एक अडथळ्यांवर मात करत अवघ्या १९ वर्षीय प्रविणाने राजस्थानातील सात गावांचा सरंपच होण्याचा बहुमान मिळविला आहे.

तिची ही कहाणी अनेक मुलींना प्रेरणा देणारी आहे. प्रविणा राजस्थानातील पाली जिल्ह्यातील साकदरा गावची रहिवासी आहे. तिला गावकरी लाडाने पपिता या नावानेही संबोधतात. आपल्या परिसरातील इतर मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये, याची दक्षता घेण्याचा निर्धार तिने केला आहे.

अर्थात, आशेच्या मार्गावर चालण्यापूर्वी प्रविणाला आयुष्यात बऱ्याच निराशेचा सामना करावा लागला. घरातील अठरा विश्वे दारिद्र्य, चार अपत्यांची जबाबदारी असलेला व्यसनी पिता, आदींमुळे तिला तिसरीमध्येच शाळा सोडावी लागली.

पैशांसाठी इतरांची गुरे चरायला नेण्याबरोबरच घरकामही करावे लागत असे. त्यातच, अल्पवयीन असतानाच विवाह होण्याची भीतीही तिला सतावत होती. मात्र, दोन वर्षांनंतर साकदरा गावापासून ४० कि.मी.वरील पाली गावातील वंचित मुलींसाठीची कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (केजीबीव्ही) तिच्या आयुष्यात आली अन्‌ वेगळी कलाटणी मिळाली.

या शाळेत विनामूल्य शिक्षण मिळणार असल्याने ‘एज्युकेट गर्ल्स’ नावाच्या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तिच्या कुटुंबीयांचे मन वळविले. त्यामुळे, शाळेचे बंद झालेले दरवाजे तिला पुन्हा खुले झाले. या शाळेतील शिक्षणाने तिचा केवळ आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला नाही तर तिला मुलींच्या शिक्षणाचे महत्त्वही पटले. या शाळेत असतानाच तिला आपल्या वडिलांना गमवावे लागले.

शालेय शिक्षण झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी एका बांधकाम कामगाराशी तिचा विवाह झाला. या शिक्षणानेच तिला सरपंचपदाची निवडणूक लढविण्याची ताकद दिली. तिच्या सासरच्या कुटुंबात ती सर्वाधिक शिकलेली होती. सासरच्या लोकांमध्ये मुलींना शिक्षणासाठी पाठविण्याची रीतच नसल्याने त्यांना आपल्या या सुनेचा अतिशय अभिमान वाटतो. आपल्या मार्गात आपले सासर न आल्याचेही तिला समाधान आहे.

शिक्षणासाठी संघर्ष

राजस्थानातील रुपवास, केरला, मुलियावास, राऊनगर, सेवरा की धनी, मूलाजी की धनी आणि नारूजी की धानी या सात गावांचे सरपंचपद तिने सांभाळले. अर्थात, सरपंचपदाचा कार्यभार संपला तरीही मुलींच्या शिक्षणासाठीचा तिचा संघर्ष सुरूच आहे. परिसरातील गावांतील शाळेत न जाणाऱ्या मुलींच्या घरी जाऊन ती त्यांच्या कुटुंबीयांचे मन वळविते.

मी एक बालवधू होऊ शकले असते जिने गुरे चरायला नेण्यात आणि घरकाम करण्यात अवघं आयुष्य घालविले असते. मात्र, मला योग्य वेळी मार्ग सापडला. आता शाळेत न जाणारी कोणतीही मुलगी आढळल्यास तिच्यावर माझ्यासारखी वेळ ओढवू नये यासाठी प्रयत्न करत आहे. सरपंचपदाची निवडणूक लढवून सरपंच झाल्यानंतर मी जास्तीत जास्त निधी शिक्षणासाठी राखून ठेवला.

- प्रविणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com