esakal | कसली घाई होती? निधनाच्या अफवेवर सुमित्रा महाजन यांचा सवाल

बोलून बातमी शोधा

Sumitra Mahajan
कसली घाई होती? निधनाच्या अफवेवर सुमित्रा महाजन यांचा सवाल
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचं ट्विट केलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केलं आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, या प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, न्यूज चॅनेल्सनी कशी काय याबाबत बातमी चालवली? त्यांनी किमान एकदा इंदौर प्रशासनाला तरी विचारायचं होतं.

रात्री उशिरा काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. जेव्हा शशी थरूर यांना समजलं की ही अफवा आहे तेव्हा ट्विटरवर आधीचं ट्विट डिलिट केलं. त्यांनी म्हटलं की, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात हे धक्कादायक आहे. सुमित्रा महाजन यांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. थरुर यांना यामुळे ट्रोलही केलं जात आहे. दुसरीकडे सुमित्रा महाजन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे ट्विट शशी थरूर यांनी केलं डिलिट

सुमित्रा महाजन यांनी म्हटलं की, न्यूज चॅनेल्स कसं काय अशी बातमी देऊ शकतात, माझ्या निधनाची बातमी देण्याआधी किमान इंदौरच्या प्रशासनाकडे चौकशी तरी करून घ्यायची. माझ्या भाचीने याबाबत थरूर यांना ट्विटरवर ही अफवा असल्याचं सांगितलं. पण खात्री करण्याआधीच असं ट्विट करण्याची काय घाई होती? असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी विचारला.

शशी थरुर यांच्या ट्विटवर भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनीही उत्तर देत म्हटलं की, सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत आहे. देव त्यांना दीर्घायुष्य देवो. त्यानंतर थरुर यांनी सुमित्रा महाजन यांच्या निधनाबद्दल केलेलं ट्विट डिलिट केलं. सुमित्रा महाजन यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.