Chhawla Case: सामूहिक अत्याचार करत डोळ्यात ॲसिड टाकून मारलं; आरोपी निर्दोष, आईचा टाहो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court

Chhawla Case: सामूहिक अत्याचार करत डोळ्यात ॲसिड टाकून मारलं; आरोपी निर्दोष, आईचा टाहो

नवी दिल्लीः छावला येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. या प्रकरणी आता तिनही आरोपी निर्दोष सुटले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर दिवंगत पीडितेच्या आईने टाहो फोडला.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना १४ फेब्रुवारी २०१२ रोजी घडली होती. १९ वर्षांच्या तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये ॲसिड टाकून तिची हत्या केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी रवी कुमार, राहुल आणि विनोद या तिघांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या तपासानंतर आरोपींनी तरुणीसोबत काय केलं ते समोर आलं. अपहरण केल्यानंतर कारमध्ये तिला जबर मारहाणदेखील झाली होती.

दिल्ली हायकोर्टाने या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींच्या वतीने या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने सोमवारी तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केलं. या निकालानंतर पीडितेच्या आईने एकच टाहो फोडला. माझ्या मुलीला मी न्याय देऊ शकले नाही, असं म्हणत तिला अश्रू अनावर झाले.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

केवळ नैतिक पतन किंवा संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवता येणार नाही. ज्या गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा होत नाही, त्याप्रकरणात पीडित कुटुंबाला निराशेचा सामना करावा लागतो. परंतु निकाल हा कायद्यानुसार लागला पाहिजे. या प्रकणात केवळ संशयापलीकडे दुसरं काहीही नाही. प्रकरण सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला. असं म्हणून कोर्टाने तिघांची मुक्तता केली.