
Delhi News : न्यायिक नियुक्त्या लवकरच; सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी जी काही नावे सुचविली आहेत त्याबाबतची प्रक्रिया वेगाने मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ४४ न्यायाधीशांच्या नावांवर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितले.
अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमानी यांनी न्यायालयास सांगितले की, ‘‘ उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १०४ जणांबाबत शिफारशी केल्या होत्या. त्यातील बऱ्याच सरकार दरबारी प्रलंबित असल्या तरी ४४ शिफारशींबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल.
या आठवड्याच्या अखेरीपर्यंत या शिफारशी सर्वोच्च न्यायालयास पाठविण्यात येतील.’’ न्या. एस.के.कौल आणि न्या. ए. एस.ओका यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांसाठी कॉलेजियमने पाच न्यायाधीशांची नावे सुचविली होती. त्याबाबतच्या शिफारशींचे नेमके काय झाले अशी विचारणा न्यायालयाने व्यंकटरमानी यांना केली.
यावर व्यंकटरमानी म्हणाले की, ‘‘आम्हाला यासाठी थोडासा अवधी मिळेल काय? मला याबाबत माहिती देण्यात आली असली तरी माझे याबाबत काहीसे वेगळे मत आहे. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांच्या अनुषंगाने जी काही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तिचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
’’ न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून न्यायालयाने याच मुद्यावर वेळोवेळी चिंता देखील व्यक्त केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही ३ फेब्रुवारी रोजी होईल.
पाच नावांची सूचना
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने पाच न्यायाधीशांच्या नावांची सूचना केली होती. त्यामध्ये न्या. पंकज मित्तल, न्या संजय करोल यांचा समावेश आहे. हे दोघेही राजस्थान आणि पाटणा उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. मागील महिन्यामध्ये याच मुद्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने याबाबतच्या प्रक्रियेवर कसल्याही प्रकारचे भाष्य खपवून घेतले जाणार नसल्याचे म्हटले आहे.