esakal | कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी सुप्रीम कोर्टानं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...
sakal

बोलून बातमी शोधा

supreme-court

कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या मृत्यूंबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल याचिका सुप्रीम कोर्टानं बुधवारी फेटाळून लावली. दीपक राज सिंह नामक एका व्यक्तीनं ही याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळताना न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. विक्रम नाथ आणि न्या. हेमा कोहली यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्याला आपल्या सूचनांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं.

खंडपीठानं म्हटलं, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देशाला प्रभावित केलं आहे. त्यामुळे उपचारांदरम्यान निष्काळजीपणामुळं हे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही." यावेळी कोर्टाने कोरोना महामारीशी संबंधित त्या प्रकरणांचाही हवाला दिला ज्याची कोर्टाने स्वतः दखल घेतली होती. कोर्टानं म्हटलं की, "महामारी संबंधित सर्व बाबी पाहण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्स बनवण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टानं कोरोनामुळं पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यासाठी ३० जून रोजी आदेशही जारी केला होता. ३० जून रोजी दिलेल्या आदेशात सुप्रीम कोर्टानं हे मान्य केलं होतं की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची ही कायदेशीर जबाबदारी आहे की, कोरोना महामारीमुळं पीडितांसाठी किमान मदत निधीची शिफारस करण्यासाठी दिशा-निर्देश तयार केले जावेत."

त्यामुळे नव्यानं नुकसान भरपाईसाठी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात सुप्रीम कोर्टानं नकार दिला. सरकारचं अद्याप याबाबत योग्य धोरण समोर आलेलं नाही. त्यामुळे जर तुमच्याजवळ याबाबतच्या धोरणासाठी काही सूचना असतील तर आपण संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करु शकता, असंही कोर्टानं यावेळी याचिकाकर्त्याला सूचवलं.

loading image
go to top