नाही! राजदीप सरदेसाईंवर अवमाननेची कारवाई नाही; कोर्टानं दिलं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने सुओमोटो (स्वतःहून) पद्धतीने अवमाननेचा फौजदारी खटला दाखल केल्याची बातमी काल आली होती.

नवी दिल्ली : पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने सुओमोटो (स्वतःहून) पद्धतीने अवमाननेचा फौजदारी खटला दाखल केल्याची बातमी काल आली होती. ही माहिती काल कोर्टाच्या वेबसाईटवर दिली गेली होती. मात्र, त्यांच्याविरोधात अशा प्रकारचा कसलाही खटला सुप्रीम कोर्टाने दाखल केला नसल्याचा निर्वाळा काल मंगळवारीच दिला. कोर्टाच्या वेबसाईटवर चुकीने ही माहिती पडली होती, ती आता दुरुस्त करण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. 

सुप्रीम कोर्टाचे उप रजिस्ट्रार राकेश शर्मा यांनी यासंबंधात माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टाद्वारे राजदीप सरदेसाई यांच्या विरोधात स्यू मोटू पद्धतीने न्यायालयाच्या अपमानासंबंधीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी काल दिली. मात्र, याप्रकारचा कसलाही खटला त्यांच्याविरोधात दाखल केला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे शर्मा यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर खटला क्रमांक एसएमसी (सीआरएल) 02/2021 च्या संबंधात दिसत असलेला खटला चुकीमुळे दिसत आहे. यामध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. 

हेही वाचा - रामदेव बाबांच्या योगाने पेट्रोल दिसेल 6 रुपये लिटर; शशी थरुरांची सरकारवर खोचक टीका

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यांत ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना 1 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच दंड न भरल्यास तीन महिने वकिली करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले होते. यावर भाष्य करताना सरदेसाई यांनी जुलै महिन्यात ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्ट कोणालाही वकिली करण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं होतं. सरदेसाई यांच्या या ट्विटवर याचिकाकर्त्याने आक्षेप घेत माननीय कोर्टावर अशा प्रकारचे हल्ले करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर कोर्टाचा हेतूपुरस्सर केलेला अवमान आहे, असं म्हटलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Supreme Court official clarified that no contempt proceeding has been initiated against Rajdeep Sardesai