esakal | लखीमपूर हत्याकांडाची सुप्रीम कोर्टानं स्वतःहून घेतली दखल; उद्या सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

supreme-court

लखीमपूर हत्याकांडाची सुप्रीम कोर्टानं स्वतःहून घेतली दखल; उद्या सुनावणी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून झालेल्या हत्याकांडप्रकरणाची सुप्रीम कोर्टाने सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कोर्टात स्वतःहूनच याची दखल घेतली आहे. तसेच उद्या (गुरुवारी) या याचिकेवर सरन्यायाधीश रमना आणि न्या. सुर्यकांत आणि न्या. हीमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

लखीमपूर खिरी येथील तिकुनिया भागात रविवारी दुपारी रक्तरंजीत संघर्ष पहायला मिळाला. या घटनेत चार आंदोलक शेतकऱ्यांसह आठ जणांच्या अंगावर वाहन चालवून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र हा आरोपी आहे. या घटनेवरुन देशभरात खळबळ माजली आहे. राजकारणही चांगलचं तापलं आहे. दरम्यान, बुधवारी सुप्रीम कोर्टानं स्वतः या प्रकरणाची दखल घेत उद्या सुनावणीचा निर्णय घेतला.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील दोन वकिलांनी नुकतेच सरन्यायाधीशांना पत्र लिहून लखीमपूर हिंसाचाराची निश्चित कालावधीसाठी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी आधीच आशिष मिश्र उर्फ मोनू याच्यावर एफआयआर दाखल झाला असून त्याच्यावर हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२, बेदरकार वाहन चालवत मृ्त्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ३०४-अ, गुन्हेगारी कट रचल्याबद्दल १२०-ब, दंगल माजवल्याप्रकरणी कलम १४७, रॅश ड्रायव्हिंगबद्दल कलम २७९ आणि कलम ३३८ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखीमपूरमध्ये रविवारी नक्की काय घडलं?

रविवार, ३ ऑक्टोबर रोजी काही शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलं होतं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर हे शेतकरी आंदोलन करणार होते. त्यानुसार, त्यांच्या मार्गावरुन जात असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या ताफ्यातील एका एसयुव्ही कारनं रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर थेट कार चालवत त्यांना चिरडलं. काल या प्रकरणी अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

loading image
go to top