नव्या सरकारचा फैसला उद्या; सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वपूर्ण निर्णय

टीम ई-सकाळ
Saturday, 23 November 2019

साडेअकरा वाजता होणार सुनावणी

- सरकार फार काळ टिकणार नाही : थोरात  

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र, या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेसच्या नेतेमंडळींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले. अजित पवार यांचा हा निर्णय पक्षविरोधी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची निवड झाली. 

दरम्यान, अजित पवार यांनी दिलेले पाठिंब्याचे पत्र विश्वासात न घेता राज्यपालांना सादर केले होते. त्यानंतर आता स्थापन झालेल्या सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सांगितले, की आमच्या याचिकेत आम्ही सर्वोच्च न्यायालायाला विनंती केली आहे, की बहुमत चाचणी उद्या घ्यावी. आम्हाला आशा आहे, सर्वोच्च न्यायालय आमची बाजू ऐकून यावर आमच्या बाजूने निर्णय देईल. आमची याचिका पटलावर घेण्यात आली आहे. 

साडेअकरा वाजता होणार सुनावणी

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी घेईल.

सरकार फार काळ टिकणार नाही : थोरात  

हे सरकार फार काळ टिकणार नाही. एकंदर परिस्थितीवर चर्चा केली आहे. आता यापुढील परिस्थितीसाठी न्यायालयीन लढा आम्ही देणार आहोत, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court will decision on Maharashtra Government Issue