esakal | सुशांतची हत्या की आत्महत्या? एम्सने CBI ला दिलेल्या रिपोर्टमधून गूढ उलगडणार
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput case aiims submitted report to cbi

एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला त्यांचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सुशांतची आत्महत्या की हत्या याचा उलगडा करण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.

सुशांतची हत्या की आत्महत्या? एम्सने CBI ला दिलेल्या रिपोर्टमधून गूढ उलगडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता एम्सच्या वैद्यकीय पथकाने त्यांचा रिपोर्ट सीबीआय़कडे सोपवला आहे. डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना सीबीआयच्या विनंतीवरून करण्यात आली होती. या समितीने शवविच्छेदन आणि व्हिसेरा रिपोर्टचा तपास केला. एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला त्यांचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सुशांतची आत्महत्या की हत्या याचा उलगडा करण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. 

एम्समधील फॉरेन्सिक टीम, सीबीआयचे पथक आणि सीएफएसएलच्या तज्ज्ञांमध्ये बैठक झाली. या बैठकीत एम्सचे चार डॉक्टर सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचले होते. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र यावेळी एम्सकडून सीबीआयला अहवाल दिल्याचं सांगण्यात आलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासासाठी प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेलं होतं. सीबीआयने म्हटलं आहे की,'एम्समधील वैद्यकीय पथक तपास करत आहे. सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या जात आहेत आणि कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करण्यात आलेली नाही.' 

हे वाचा - कंगना- संजय राऊत ट्विट वॉर, आज राऊतांची बाजू न्यायालयात होणार सादर

दरम्यान, सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटलं होतं की, 'सुशांतच्या तपासात सीबीआयकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज आहे. एम्समध्ये काम केलेल्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की फोटो पाहून तर 200 टक्के हा खूनच आहे आत्महत्या नाही.' याशिवाय त्यांनी एम्सच्या डॉक्टरांकडून अहवालातील निष्कर्षही आपल्याला समजल्याचा दावा केला होता. 

एम्सच्या फॉरेन्सिक टीमचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी म्हटलं की, सीबीआयने अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. अंतिम बैठक होणं अजुन बाकी आहे. फक्त फोटो पाहून काही ठरवता येणार नाही. निर्णय हा स्पष्ट आणि पुराव्यांच्या आधारे असायला हवा.