सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण;  रियाच्या भावाचीही 'ईडी'कडून चौकशी 

पीटीआय
Monday, 10 August 2020

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रियाच्या भावाच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.सक्तवसुली संचालनालयाने रियापाठोपाठ तिचा भाऊ शौविक याची देखील चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली/मुंबई - अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या भावाच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रियापाठोपाठ तिचा भाऊ शौविक याची देखील रविवारी रात्रभर अठरा तास चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुशांतला अडचणीत आणणाऱ्या आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणामध्ये शौविकचा देखील हात असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. 

रविवारी पहाटे ६.३० च्या सुमारास शौविक तपास यंत्रणेच्या बलार्ड इस्टेट ऑफिसमधून बाहेर पडताना दिसल्याचे सूत्रांनी सांगितले. आम्ही शौविकचा जबाब नोंदवून घेतला असल्याचे 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वैयक्तिक उद्योग, आर्थिक प्राप्ती, गुंतवणूक आणि बहिणीच्या सुशांतसोबतच्या आर्थिक व्यवहारांबाबत त्याची चौकशी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याआधी सात ऑगस्ट रोजी देखील त्याची चौकशी करण्यात आली होती. रिया आणि तिच्या वडिलांची पुन्हा उद्या (ता.१०) रोजी 'ईडी'कडून चौकशी होणार असून यासंदर्भात त्यांना याआधीच समन्स बजावण्यात आले आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी 'ईडी'ने रियाच्या सनदी लेखापालाची देखील चौकशी केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'एफआयआर राजकीय भावनेने प्रेरित' 
नवी दिल्लीः सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणावरून महाराष्ट्र विरूद्ध बिहार हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आम्ही या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करत असताना बिहार पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेला एफआयआर हा राजकीय भावनेने प्रेरित असून तो संघराज्याच्या मुलभूत तत्वांची पायमल्ली करणारा असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयास सांगितले आहे. हा एफआयआर पाटण्यातून मुंबईमध्ये हालविण्यात यावा अशी मागणी करणारी एक याचिका अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली असून त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सरकारने देखील न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणामध्ये सीबीआयने गुन्हा नोंदविण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची वाट पहायला हवी होती असेही महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे. सुशांतचे वडील कृष्णाकिशोर सिंह यांनी या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh suicide case;  ED had questioned Riya brother Shouvik