
एकतर लालू प्रसाद यादव तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही या प्रकारे फोन करत असल्याचा आरोप सनसनाटी आहे.
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणूक अत्यंत रोमांचक झाली. राजदच्या तेजस्वी यादव यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे एनडीए हातातून सत्ता गमावून बसते की काय, अशी परिस्थिती मतमोजणीपूर्व अंदाजांमध्ये दिसून आली. लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीतही महागठबंधन आघाडीने चांगली कामगिरी दाखवली पण सरतेशेवटी एनडीएच्याच गळ्यात विजयाची माळ पडली. नितीश कुमार पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, राजद अजूनही सत्तेसाठी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केला.
Lalu Yadav making telephone call (8051216302) from Ranchi to NDA MLAs & promising ministerial berths. When I telephoned, Lalu directly picked up.I said don’t do these dirty tricks from jail, you will not succeed. @News18Bihar @ABPNews @ANI @ZeeBiharNews
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 24, 2020
भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी काल मंगळवारी आरोप केला आहे की, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते एनडीएच्या आमदारांना पक्ष बदलण्यास सांगत आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ट्विट करुन हा सनसनाटी आरोप केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये एक फोन नंबरही दिला आहे. त्यांनी दावा केलाय की चारा घोटाळ्यात आरोपी म्हणून शिक्षा भोगत असतानाही लालू प्रसाद यादव या नंबर वरुन बोलत आहेत.
हेही वाचा - 'मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम एअरपोर्ट'; अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावाला मंजूरी
मोदी यांनी ट्विट केलंय की, लालू प्रसाद यादव रांचीमधून एनडीएच्या आमदारांना फोन (8051216302) करत आहेत तसेच त्यांना मंत्रीपदाचे आश्वासन देत आहेत. जेंव्हा मी फोन केला. तेंव्हा थेट त्यांनी तो फोन उचलला. मी त्यांना म्हटलं की, तुरुंगात राहून या प्रकारच्या घाणेरड्या पद्धती वापरु नका. यात तुम्ही यशस्वी होणार नाही.
त्यांच्या या आरोपामुळे बिहारमध्ये खळबळ माजली आहे. एकतर लालू प्रसाद यादव तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही या प्रकारे फोन करत असल्याचा आरोप सनसनाटी आहे. शिवाय फोनवरुन ते एनडीएच्या आमदारांना सत्तेसाठी फोडत असल्याचा हा आरोप गंभीर मानला जातोय.