'मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम एअरपोर्ट'; अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावाला मंजूरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

भविष्यात या विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा दिला जाईल.

लखनऊ : अयोध्यामध्ये बहुप्रतिक्षित राममंदिराच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. बाबरी मस्जिदीचा विध्वंस आणि त्यानंतर राममंदिराची उभारणी हा देशातीलच नव्हे तर जगातील चर्चेचा विषय राहिला आहे. राममंदिराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारच्या कॅबिनेटमध्ये अयोध्यामधील एअरपोर्टचे नाव 'मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम एअरपोर्ट' या नावाने केलं जाण्याच्या प्रस्तवाला मंजुरी देण्यात आली आहे. 

हेही वाचा - काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेलांची महत्त्वाची भुमिका; PM नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

भविष्यात या विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा दिला जाईल. यासाठी एअरपोर्टचा परिसर वाढवण्याचा प्रस्ताव आहे तसेच याचे इन्फ्रास्ट्रक्चरदेखील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या दर्जाचे असावे, याची काळजी घेतली जात आहे. अयोध्यामध्ये राममंदिर उभं राहिल्यानंतर फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक येतील, हे लक्षात ठेवून या एअरपोर्टची उभारणी करण्यात येणार आहे. 

याबाबत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौऱ्या यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आपले उत्तर प्रदेश सरकार श्रीराम लल्लाची नगरी अयोध्येला जगातील धार्मिक स्थळांमधील एक अग्रणीचं स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अयोध्येतील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वरुपात विकसित केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात इथे ए 321 आणि दुसऱ्या टप्प्यात कोड-ई बी 777.300 श्रेणीच्या विमानांची उड्डाणे होतील. योगी सरकारने या एअरपोर्टच्या उभारणीसाठी 525 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना चालू भाषणात मधेच थांबवलं

येत्या तीन ते चार वर्षांत अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीचे काम पूर्ण होईल. तसेच देश-विदेशातील रामभक्त तसेच पर्यटक मंदिराच्या दर्शनासाठी येथे यायला लागतील. यासाठी म्हणूनच सर्वांत आधी योगी सरकार अयोध्याचे दिल्ली आणि लखनऊशी असलेली कनेक्टीव्हीटी अधिक चांगली करण्याच्या दिशेने काम करत आहे. अयोध्याच्या रेल्वे स्टेशन आणि बस टर्मिनल या दोन्हींवरही 2019 पासूनच काम सुरु करण्यात आलं आहे. तसेच आता हवाई मार्गाने अयोध्येला पोहोचण्यसाठी इथे 600 एकर जागेवर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एअरपोर्टच्या निर्मितीचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ए 321 विमानांसाठी 463.10 एकर जमीनीची आवश्यकता असणार आहे. त्यावरील रन-वे ची लांबी 3125 मीटर आणि रुंदी 45 मीटर असेल. दुसऱ्या टप्प्यातील बोईंग 777 प्रकारच्या विमानांसाठी 122.87 एकर जमीनीची आवश्यकता असेल. या रन-वेची लांबी 3750 मीटर आणि रुंदी 45 मीटर असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maryada Purushottam Sri Ram Airport Yogi Adityanath govt decides