Bihar Politics : धोका दिल्यामुळेच भाजपने शिवसेना फोडली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushil Kumar Modi BJP split Shiv Sena arvind sawant nitishkumar bihar

Bihar Politics : धोका दिल्यामुळेच भाजपने शिवसेना फोडली!

पाटणा : बिहारमधील ताज्या सत्तांतरावरून माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त जनता दलालाला धारेवर धरतानाच मोदी यांनी महाराष्ट्रात धोका दिल्याने भाजपने शिवसेना फोडल्याचा दावा केला. मोदी यांच्या या विधानावरून शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पक्ष फोडणे हे भाजपचा धंदाच असल्याचा टोला त्यांनी लगावला. सुशील मोदी म्हणाले की, ‘‘ महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि संयुक्त जनता दल या पक्षांना लोकसभा निवडणुकीत आपण नरेंद्र मोदींना पराभूत करू असे वाटते पण ते हे विसरत आहेत की मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षाही अनेकपटीने वाढली आहे.

त्यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ. आज लिहून ठेवा.. हे सरकार वर्षही पूर्ण करू शकणार नाही त्याआधीच ते कोसळेल.’’ नितीश यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ‘‘नितीशकुमार म्हणतात आमच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी ४० आमदार हवे आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपने फोडले असते तरी सरकार स्थापन झाले असते का? आम्ही का त्यांचा पक्ष फोडावा? त्यांच्याकडे ४४-४५ आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले. आम्हाला काही करायचे असते तर आम्ही तेव्हाच फोडाफोड केली असती. मात्र, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला.’’

नितीश कुमार यांची प्रतिमा ही चिरकाल टिकणारी नाही, हे आकडेवारीतून दिसते. २०१०मध्ये त्यांचे ११७ आमदार होते. २०१५मध्ये त्यांची संख्या ७२ झाली आणि आता ४३ पर्यंत घसरली आहे. नितीश कुमार यांची प्रतिमा अबाधित आहे. असे अनेक राजकीय विश्‍लेषक सांगतात. पण आकड्यांमधून तसे दिसत नाही.

- प्रशांत किशोर, राजकीय रणनीतीकार

नितीश कुमार २०१७ मध्ये ‘आरजेडी’पासून वेगळे झाले तेव्हा म्हणाले होते, की ‘आरजेडी’ आमचा पक्ष फोडत आहे. कालही नितीश कुमार यांनी भाजप त्यांचा पक्ष फोडत आहे, असे सांगितले. यावरूनच हे नियोजनपूर्वक केलेले षडयंत्र आहे.

- तारकिशोर प्रसाद, माजी उपमुख्यमंत्री, बिहार

या सरकारने केवळ शपथ नाही घेतली तर २०१७ पासून २०२०पर्यंतच्या जनमताची ‘घरवापसी’ झाली आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडविण्याचे कारस्थान भाजप करीत असताना असे होणे महत्त्वपूर्ण आहे. यातून बिहारने एक संदेश दिला आहे.

- मनोज झा, राज्यसभा खासदार, आरजेडी

नितीश कुमार बिगर काँग्रेसी नेते आहेत. त्यांचे राजकारण हे काँग्रेसवादाला छेद देणारे आहे. आता हे सर्व समाप्त झाले आहे का?. नितीश कुमार यांनी भ्रष्टाचार आणि काँग्रेसवादाबरोबर तडजोड केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल.

- रविशंकर प्रसाद, माजी केंद्रीय मंत्री

नितीशजी यांचे सहकारी चांगले नाहीत. आमच्या प्रेमाचे तुम्ही चांगले पांग फेडले. ही तर मोठी चुकीची गोष्ट आहे. जेव्हा कधी त्यांची भेट झाली, तेव्हा वाटले नाही की ते सोडून जातील, असे कधी वाटले नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४० जागा मिळतील

- शाहनवाझ हुसेन, माजी मंत्री, बिहार

नितीश कुमार हे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. ते समर्थ नेते आहेतच शिवाय जर देशवासीयांनी मनात आणले तर ते पंतप्रधान बनण्याच्या योग्यतेचे आहेत. तेजस्वी यादव हे बिहारच्या युवकांचे आदर्श आहेत. आज जे काही होत आहे, ते बिहारच्या भल्याचेच आहे.

- शत्रुघ्न सिन्हा, नेते, तृणमूल काँग्रेस पक्ष

सन्मानालाच धोका दिला

अमित शहांनी फोन केला तेव्हा नितीश यांनी आरसीपी सिंह यांचे नाव दिले. त्यानंतरच सिंह यांना मंत्री करण्यात आले. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा कोणता नेता मंत्री होतो, यामुळे भाजपला काहीही फरक पडत नाही. भाजपने नितीशकुमार यांना जेवढा सन्मान दिला तेवढा सन्मान त्यांना राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससोबत मिळू शकणार नाही. १९९६ पासून पाहिले तर, अटलबिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदींचे सरकार असो, भाजपने त्यांना सन्मान दिला. त्या सन्मानालाच त्यांनी धोका दिला, अशी टीकाही मोदी यांनी केला.

Web Title: Sushil Kumar Modi Bjp Split Shiv Sena Arvind Sawant Nitishkumar Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..